Nagpur Marathi News : नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका महिलेचा जीव वाचला. नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढताना महिलेचा तोल गेला, परंतु कॉन्स्टेबल धीरज दलाल यांनी तिला तत्काळ मदत केली.
नागपूरमधील स्थानकावर ही घटना सोमवारी सुमारे सायंकाळी ६ वाजता घडली. नागपूर-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१३६) स्थानकातून सुटत असताना, एका महिला प्रवाशाला ती गाडी पकडण्याची घाई झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही महिला प्रवासी फुटओव्हर ब्रिजवरून धावतच प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आली आणि तिने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावत्या ट्रेनमध्ये चढताना तिचा तोल गेला आणि ती थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान कोसळण्याच्या स्थितीत आली.
नागपूरमध्ये खरा कर्तव्यदक्ष! नागपूरमध्ये RPF जवानाने तरूणीचे वाचवले प्राण, ट्रेन सुटली तितक्यात… Video व्हायरल #Nagpur #Nagpurnews #VideoViral #marathinews pic.twitter.com/iTRqFikOWA
— Harish Malusare (@harish_malusare) July 1, 2025
Nagpur News: अवैध आश्रमावर कारवाई; चालकांवर गुन्हा दाखल, सुटका केलेली दोन मुले बालगृहात
क्षणातच प्रसंगाची गंभीरता ओळखून, ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल धीरज दलाल यांनी धाव घेतली. त्यांनी प्रचंड धाडस दाखवत त्या महिलेला पटकन पकडले आणि सुरक्षित स्थळी ओढून बाहेर काढले. काही सेकंदांचा विलंब झाला असता, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.
या धाडसी कृतीमुळे त्या महिलेचा जीव वाचला. प्रसंगानंतर सदर महिला प्रवासीने आरपीएफ आणि कॉन्स्टेबल धीरज दलाल यांचे मनःपूर्वक आभार मानले. तिच्या म्हणण्यानुसार, “जर वेळेत मदत मिळाली नसती, तर मोठी दुर्घटना निश्चितच घडली असती.” रेल्वे प्रशासनानेही कॉन्स्टेबल धीरज दलाल यांच्या तत्परतेचे व साहसाचे कौतुक केले असून, त्यांना इतरांसाठी आदर्श उदाहरण ठरल्याचे म्हटले आहे. “ऑपरेशन जीवन रक्षक” या मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दल किती कटिबद्ध आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Nagpur Crime : 15 वर्षाच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर कारमध्ये नको ते घृणास्पद कृत्य, तरुणाला अटक
रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये घाईगडबडीने चढण्याचे प्रकार वारंवार घडत असतात, ज्यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात होतात. परंतु अशा प्रसंगी तात्काळ पावले उचलणाऱ्या सुरक्षा जवानांचे कार्यच प्रवाशांचा जीव वाचवते. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांनी धावत्या गाड्यांमध्ये चढण्याचा धोका टाळावा, असे आवाहन केले आहे. कॉन्स्टेबल धीरज दलाल यांच्या शौर्यामुळे केवळ एका महिलेला जीवनदान मिळाले नाही, तर “ऑपरेशन जीवन रक्षक” मोहिमेचा उद्देश किती यशस्वी आहे, हेही अधोरेखित झाले आहे. आरपीएफची ही तत्परता आणि धाडस प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहे.

