• Wed. Jun 17th, 2026

    नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 27, 2025
    नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के नागरिकांनी तीन विश्वविक्रम केले. याद्वारे सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असून, असेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आखावेत. आपण जिल्हा परिषदेच्या पाठीशी आहोत, अशी कौतुकाची थाप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा परिषद प्रशासनाच्या पाठीवर दिली.

    शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला. यानिमित्त आयोजित अभिनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वसंतरावदादा पाटील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटेकर, विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अकरा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांपुढे मांडलेल्या प्रस्तावानंतर योगांचे महत्त्व जगाने अनुसरले. जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. यात जगभरातील 175 देशांतील सर्वोच्च नेत्यापासून सामान्य नागरिक अशा जवळपास 10 कोटी व्यक्ती सहभागी होतात. योग दिन एका दिवसापुरता न राहता कित्येकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शारीरिक स्वास्थ्य, एकाग्रता, प्रखर बुद्धी असे अनेक फायदे योग केल्याने होतात. शरीर, मन, बुद्धी यांची ओळख करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

    पुणे येथे दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या योग कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्याने सांगलीतील कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही. मात्र, आपण जिल्हा परिषद प्रशासनाच्या संपर्कात होतो व कार्यक्रमाची नियमित माहिती घेत होतो. विश्वविक्रम झाल्यानंतरही लगेचच आपण जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

    दिनांक 21 जून या जागतिक योग दिनी वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तिंनी केलेला योग या नावाने सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी केलेला हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदला गेला. यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरवोद्गार काढले.

     जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विश्वविक्रमी भक्तियोगाचा संकल्प ते प्रत्यक्ष विश्वविक्रम याचा प्रवास प्रास्ताविकात सांगितला. शहरी व विशेषतः ग्रामीण भागातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, चितळे डेअरीचे प्रतिनिधी विवेक काटेकर, विश्व योग दर्शन केंद्राचे योगविशारद बालकृष्ण चिटणीस यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख व जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांचा भेटवस्तू देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed