• Fri. Mar 6th, 2026
    दोन्ही पोरं मदरशात होती म्हणून वाचली, विधवा हिनाचा गुदमरून मृत्यू; सोलापूर आगीने आईला हिरावलं

    Solapur Towel Factory Fire: सोलापुरातील एका टॉवेल कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत बागवान कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये आई-वडील आणि मुला-मुलीचा समावेश आहे. हे लोक इथेच राहून कारखान्यात काम करत होते.

    (फोटो– Lipi)

    इरफान शेख, सोलापूर: अक्कलकोट रोड एमआयडीसीत सेंट्रल हॅण्डलूम इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीत बागवान कुटुंबाची मोठी जीवितहानी झाली आहे. हिना वसीम शेखचाही या आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे. हिना शेखचा विवाह झाला होता. त्यानंतर ती पनवेल येथे राहावयास होती. मात्र, पतीच्या निधनानंतर महताब बागवान यांची मुलगी हिना दोन मुलांसह सोलापूरमधील आई-वडिलांकडे राहावयास आली होती.

    हिनाची दोन्ही मुलं आहिल आणि आहाब मदरशात शिकायला होती. 15 दिवसांपूर्वी हिना बागवानने आपली दोन मुले अहिल (वय 13), आहाब (वय 10) यांना शिक्षणासाठी मदरशात पाठवले होते. जर, तिने पोरांना मदरशात पाठवले नसते तर कदाचित ते ही या आगीत अडकले असते.

    पतीच्या निधनानंतर हिना आई-वडिलांकडे राहायची

    हिना वसीम शेख ही अनेक वर्षांपासून वडील महताब बागवान यांच्याकडे राहत होती. हिना शेख विधवा झाल्याने आई-वडील आणि भाऊ सलमान यांचा हिनाला मोठा आधार होता. अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’ तील सेंट्रल इंडस्ट्रीज टेक्स्टाईल कारखान्याला आग लागून तिथेच वास्तव्यास असलेल्या आणि काम करणाऱ्या बागवान कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. कुटुंबप्रमुख महताब बागवान यांची मुलगी हिना शेख या आपल्या आई-वडिलांसह राहायच्या. बागवान परिवारातील सर्व सदस्य टॉवेल कारखान्यात वास्तव्यास होते.
    Solapur Fire: पहाटे फोन, बाथरुममध्ये आहोत आम्हाला वाचवा; कारखान्याचे मालक कुटुंबासोबत आगीत अडकले, सोलापुरात खळबळ

    15 दिवसांपूर्वी हिनाचे दोन्ही मुलं मदरशात शिक्षणासाठी गेले

    विधवा हिना आई-वडिलांसोबत सेंट्रल हॅण्डलूम टॉवेल इंडस्ट्रीज या कारखान्यात काम करत होती. कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी हे यांच्या कारखान्यातील सर्व कामकाज करत घरचे काम करण्याची जबाबदारी बागवान कुटुंबावर होती. विधवा हिनाला दोन्ही मुलांची मोठी चिंता होती. टॉवेल कारखाना मालक उस्मान मंसुरी यांनी हिनाला दोन्ही लहान मुलांना मदरशात शिक्षणासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला होता. 15 दिवसांपूर्वी अहिल (वय 13), आहाब (वय 10) या चिमुकल्यांना सोलापूर जिल्ह्यातील मदरशात शिक्षणासाठी दाखल केले. आहिल आणि अहाब ही दोन्ही चिमुकली आई-वडिलां विना पोरकी झाली आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed