• Sat. Sep 19th, 2026

सोलापुरात मोठी दुर्घटना; MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

ByMH LIVE NEWS

May 18, 2025
सोलापुरात मोठी दुर्घटना; MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Edited byअक्षय शितोळेContributed byइरफान शेख|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग (फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी चार ते पाच कामगार अडकल्याचे समजते. संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान 108 या क्रमांकावर ॲम्ब्युलन्सला फोन करण्यात आला. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या. एमआयडीसीतील कारखान्यात लागलेल्या आगीची माहिती मिळताच पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीनंतर कारखान्यात अडकलेल्या अनेक कामगारांना बाहेर काढण्यात आले असून यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मयतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, आठ ते दहा गाड्यांच्या साहाय्याने पाणी मारून झाले तरीही अजून आग आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. या दुर्घटनेत जीवितहानीसह टॉवेल कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed