• Sat. Sep 19th, 2026

समर्थ रिक्षा आदर्श रिक्षेचा नारा देत ई रिक्षाचे ठाण्‍यात पदार्पण

ByMH LIVE NEWS

May 17, 2025
समर्थ रिक्षा आदर्श रिक्षेचा नारा देत ई रिक्षाचे ठाण्‍यात पदार्पण


ठाणे-प्रतिनिधी
पुरूष रिक्षा चालकानंतर, महिला रिक्षा चालक आल्‍या आता पहिल्‍यांदा ठाण्‍यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झाले. यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक महिलांना मोफत ई-रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठीच्या या रिक्षा समर्थ रिक्षा, आदर्श रिक्षाचा नारा देण्यात ठाण्यात नवा संदेश देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथीय महिला रिक्षा चालक ठरल्या.पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रीक वाहनांची सद्दी सुरु झाली आहे. मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारात अजूनही ई-रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या. समर्थ भारत व्यासपीठ रोटरी क्लब ऑफ लेक सिटी आणि  अॅटॉस इंडीया कंपनीच्या पुढाकाराने ठाण्यातील विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक १५ महिलांना मोफत ई-रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आज ५ जणींना ई-रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅच व ई-रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत.
जिल्हा न्यायाधीश सोनल शहा, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, रोटरीचे डीस्ट्रीक्ट गर्व्हनर दिनेश मेहता, असिस्टंट मानसिंग खाडे, ठामपा शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे, क्लब प्रेसिडंट जगदीश चेलारामानी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले,  निखील सुळे, निवृत्त आरटीओ अधिकारी कमलेश चव्हाण, प्रसाद तेंडुलकर, अनिरुद्ध वैरागकर, प्रफुल्ल रुईवाले, अनुराधा रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नौपाड्यातील रोटरी सेंटर येथे रिक्षा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
ठाणे परिसरात गेल्या काही महिन्यात जवळपास २० जणांचा अपघाती मृत्यू झाला. वाहतुकीचे नियम चालकांनी पाळले तर अनेक घरातील कर्ती व्यक्ती अपघातातून मृत्यूमुखी पडण्यापासून वाचेल. महिला रिक्षा चालक वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करतील आणि समर्थ रिक्षा या आदर्श रिक्षा ठरतील असा आशावाद वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
रिक्षा वाटपाचा पुढील टप्पा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी होणार आहे. त्यावेळेस उर्वरित ११ महिलांना रिक्षा वाटप करण्यात येईल. आज तृतीय पंथीय करीना आडे हिच्यासह सविता रणपिसे, रत्नावली जाधव, संगीता मांजरेकर, उज्वला शिंदे या महिलांना मोफत रिक्षांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed