Bhayanderpada Flyover on Ghodbunder Road : ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ३४ कोटी रुपये खर्चून एमएमआरडीएने हा पूल बांधला आहे. या उड्डाणपुलामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होणार आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घोडबंदर रस्त्यावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर रोज होणाऱ्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त आहेत. अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन बंद पडल्यानंतर तासनतास कोंडीमध्ये वाहने खोळंबतात. त्यामुळे उड्डाणपूल उभारून कोंडी फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, कासारवडवली आणि भाईंदरपाडा येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी कासारवडवली येथील उड्डाणपुलाचे काम अद्याप चालू आहे. लोकार्पणप्रसंगी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह ‘एमएमआरडीए’ चे अधिकारी उपस्थित होते.
HSRP नंबरप्लेटबाबत आता वेगळीच समस्या, ग्राहकांना मनस्ताप; काम कंत्राटदार की वाहनचालकाचं, मोठा संभ्रम
‘वर्षाअखेरीस मेट्रोची चाचणी करण्याचा प्रयत्न’
ठाण्यातही वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रोची चाचणी झाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न राहिल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भाईंदरपाडा उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही माहिती दिली. सर्वांत मोठे मेट्रोचे जाळे ‘एमएमआर क्षेत्रामध्ये निर्माण होत आहे.
Mira Bhayander Metro : ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रो लवकरच सुरू, एमएमआरडीएकडून चाचणी होणार; कसा असेल मार्ग?
गायमुख ते दहिसर चेकनाका या मेट्रो मार्गिकेसाठी जमीन भूसंपादन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारत असल्याने लोकांना कुठूनही कुठे जाणे शक्य होणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास नागरिकांचा वेळ वाचेल. आणि प्रदूषणही कमी होईल, असेही ते म्हणाले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे या उड्डाणपुलाचे काम वेळेत आणि चांगल्या दर्जाचे झाले असे ते म्हणाले.
Bhayanderpada Bridge : भाईंदरपाडा उड्डाणपूल खुला, घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडीचा त्रास कमी होणार; कसा आहे मार्ग?
लांबी ६०१ मीटर, खर्च ३४ कोटी रुपये, कसा आहे मार्ग?
भाईंदरपाडा उड्डाणपुलासाठी ३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाची लांबी ६०१ मीटर असून घोडबंदरकडून ठाण्याच्या दिशेने आणि ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या या पुलावर प्रत्येकी दोन-दोन मार्गिका आहेत. तर भुयारी मार्गाचा भाग २०.४ मीटर आहे. उड्डाणपुलावर ३०० मीमी एम ४० ग्रेडच्या सिमेंट काँक्रीटची जाडी असून मध्यवर्ती भुयारी मार्गावरील पृष्ठभागावर मास्टिकचा थर पसरवण्यात आलेला आहे. भुयारी मार्गामुळे वाहतूककोंडी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

