• Wed. Apr 23rd, 2025 2:50:26 PM
    ठाकरे मोदींना जाऊन भेटले, म्हणाले युती करायचीय, पण…; विधिमंडळात शिंदेंचा मोठा गोप्यस्फोट

    Eknath Shinde: विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यात तुफान जुंपली. नोटिस आले म्हणून तिकडे गेले, असा आरोप परब यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यात तुफान जुंपली. नोटिस आले म्हणून तिकडे गेले, असा आरोप परब यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परब साहेब तुमचा इतिहास मला माहीत आहे. मला सगळं माहीत आहे. त्यामुळे मला अधिक बोलायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला.

    ‘आम्ही अडीच वर्षात केलेल्या कामामुळे पुन्हा आलो. तुमचं तर विरोधी पक्षनेतेपद गेलं. मला एक अंदर की बातमी सांगायची आहे. यांचे प्रमुख मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा म्हणाले. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतो म्हणाले. पण इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण (परबांना उद्देशून) गेला होतात. तुम्हाला जेव्हा नोटिस आली, तेव्हा तुम्ही गेला होतात. तुम्ही म्हणालात, मला यातून सोडवा. पण सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. आम्ही केलं ते खुलेआम केलं. आम्ही लपूनछपून गेलो नाही. शिवसेना धोक्यात आली, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व धोक्यात आलं तेव्हा तुमचं सरकार पलटी केलं. हे करायला वाघाचं काळीज लागतं. लांडगा वाघाचं कातडं पांघरुन वाघ होत नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे बरसले.
    आम्ही सूर्यास्ताच्या दिशेनं! मुनगंटीवारांनी बावनकुळेंना ऐकवलं; भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी
    ‘परब साहेब तुमचा इतिहास मला माहीत आहे. मला सगळं माहीत आहे. अंडीपिल्ली माहीत आहेत. कोण कशासाठी कुठे गेलं, याची कल्पना मला आहे. मी जे केलं, ते खुलेआम केलं. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं की शिवसेना, भाजप युती करा. तेव्हा काय मी मुख्यमंत्री होणार होतो? तरीही पाच वेळा त्यांना सांगितलं होतं. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा इतका मोह का झाला? बाळासाहेबांनी सांगितलं होतं जाऊ नका काँग्रेससोबत. का गेलात? आम्ही तर सत्ता सोडली, मंत्रिपदं सोडून गेलो. पुढे काय होणार याची कल्पना नव्हती, तरीही ८ जणांनी मंत्रिपदं सोडली’, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेसेनेला लक्ष्य केलं.

    eknath shinde

    ‘तुम्ही २०१९ मध्ये काँग्रेससोबत जाऊन सत्ता मिळवली. बाळासाहेबांचे विचार सोडून औरंगजेबाचे विचार स्वीकारले. तुम्हाला हिंदुत्त्वावर बोलायचा अधिकार काय? हे (परब) गेले होते तिकडे, लोटांगण घालून आले, म्हणाले मला वाचवा, मला वाचवा आणि मग इथे येऊन पलटी मारली. यांचे प्रमुख पण तिकडे गेले आणि आम्ही युती सरकार स्थापन करु म्हणाले. इकडे आल्यावर पलटी मारली. भाजपचे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या चार जणांना तुरुंगात टाकणार होते. त्यांना तुरुंगात टाकून भाजपचे आमदार फोडून त्यांना महाविकास आघाडीत घेणार होते. मी यांचा डाव हाणून पाडला. यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं,’ असं म्हणत शिंदे ठाकरेसेनेवर तुटून पडले.

    shinde vs uddhav

    ‘सत्तेसाठी लाचार झाले. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेससोबत गेले. शिवरायांचे विचार सोडले. एकनाथ शिंदेनं धाडस करुन शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला. त्यामुळेच ८० जागा लढवून आम्ही ५७ जागा जिंकल्या. तुम्हाला १०० जागा लढवून फक्त २० मिळाल्या. जनतेनं तुम्हाला धडा शिकवला. लोकसभेच्या निवडणुकीत याकूब मेमनची कबर सजवली, पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,’ अशी घणाघाती टीका शिंदेंनी केली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed