Dhananjay Munde slams Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील आरोपांची धार अद्याप कमी झालेली दिसत नाही. आमदार सुरेश धस यांनी कृषी घोटाळ्यासंदर्भात मुंडेंविरोधात ईडीकडे तक्रार केली आहे. त्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा मुंडेंवर निशाणा साधला. ‘घरातील लोकसुद्धा मुंडेंवर त्यांच्यावर नाराज असतील, गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत,’ असे सुरेश धस म्हणाले. धसांच्या या विधानावर मुंडेंनी तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथ्रा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत, तिथेच राहत आहोत. ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते, असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले. तर मुंडे असेही सुनावले की, ‘माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे, मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले गेले आहेत.’
धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. ‘मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुद्धा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.’ असे बोल मुंडेंनी लावले.
‘राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल, तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे.’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी धसांवर प्रहार केला आहे.

