• Thu. Sep 10th, 2026

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, ५१ हजाराचे बक्षीस – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 1, 2025
अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, ५१ हजाराचे बक्षीस – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी, अमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून, त्यासाठी ५१ हजाराचे बक्षीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या चौथ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करून राज्यात अमली पदार्थविरोधी सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करावेत, याचा पुनरूच्चार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

गत आठवड्यामध्ये अमली पदार्थ साठे सापडण्याची नवीन घटना आढळली नाही. मात्र, जे साठे सापडले आहेत, त्यावरील कायदेशीर कारवाया गांभीर्याने सुरू आहेत. बंद कारखान्यांची तपासणी सातत्याने सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत प्रार्थनेच्या आधी अमली पदार्थ विरोधी प्रबोधन उपक्रम सुरू करत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, प्रबोधन गीत व व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफीत असा उपक्रम राबविण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने प्रार्थनेच्या वेळी अमली पदार्थविरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह तीन मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करावी. हे गीत अमली पदार्थविरोधी आशयघन, प्रभावी, आकर्षक (कॅची) व नेमके प्रबोधन करणारे असावे. त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती करावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेची संपूर्ण कार्यवाही पार पाडावी. प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 51 हजार असावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अमली पदार्थ घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, कायद्याच्या कचाट्यातून दोषी सुटू नयेत, या अनुषंगाने अशा प्रकरणात चांगले वकील द्यावेत, असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच अमली पदार्थांचे दुष्परिणाम रुजविण्याची गरज आहे. जेवणाच्या सुटीत विद्यार्थी शाळा कुंपणातून बाहेर जाणार नाहीत, यासाठी शाळांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्स शोधून काढावेत व त्या ठिकाणी कोणतीही दुष्कृत्ये होणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उर्वरित बंद कारखाने तपासणी कालमर्यादेत पूर्ण करावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादरीकरण केले.

क्राईम टास्क फोर्सचाही घेतला आढावा

दरम्यान, सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सांगली शहरच्या पोलीस उपाअधीक्षक विमला एम. प्रत्यक्षात व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी, तसेच, गुन्हेगारी घटना घडू नयेत, नागरिकामध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली, मिरजसारख्या शहरात गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे १० हजार लोकसंख्येच्या परिक्षेत्रासाठी छोट्या चौक्या निर्माण कराव्यात. तिथे गस्त देण्यासाठी तीन पाळीत गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांना नेमावे. त्यांची अदृश्य भीती निर्माण करावी. पोलिसांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत घ्यावी. सीसीटीव्ही बसवावेत, असे त्यांनी सूचित केले.

क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा दर आठवड्याला घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिरीक्त पोलिस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन वेळोवेळी घटनानिहाय आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पोलिसांनी सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे. सर्वसामान्य माणसाला निर्भय वाटावे, या पद्धतीने कामकाज करावे, असे ते म्हणाले.

अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस विभागाची कामगिरी, गुन्हेगारी घटनांचा आढावा सादर केला.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed