• Tue. Jun 16th, 2026

    हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2025
    हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी औषधोपचार मोहिमेला सहकार्य करा – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद




    मुंबई, दि. २५: हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

    आरोग्यभवन येथे मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक झाली. बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा. घरी, कार्यालयात किंवा शाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येणारी औषधे सेवन करावी. त्यामुळे निश्चितपणे आपण हत्तीरोगावर मात करू शकता. आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करून हत्तीरोगापासून आपला बचाव करावा, असेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

    राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच जिल्ह्यांमधील एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्येपैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषध देण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील काळात राज्‍यातील १८ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांतून हत्‍तीरोगाचे दुरीकरण करण्‍यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    ०००

    अर्चना देशमुख/विसंअ/







    रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
    मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed