• Fri. Jul 3rd, 2026

    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2025
    जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

    सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

    जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या 

    प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार

    पालकमंत्री यांच्याकडून सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    सोलापूर, दिनांक २६ (जिमाका):- विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   आपला  सोलापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,   वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चौफेर  प्रगती   करत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी  सहकार्य  केले  जाईल, अशी  ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

    भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

    पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारुन ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली, त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा करतो.

    सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात  एकूण ११ लाख २० हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० लाख ५५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत ६ हजार १४४ लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका ५ हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ७ लाख २० हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

    सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे.  राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण २८२.७५ कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता १२९.४० कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता ७३.८५ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

    सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात दिनांक २२ जानेवारी २०२५ ते ०८ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

    जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी देऊन कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसून प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

    पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांचे समवेत परेड संचलन केले.  त्यानंतर पतसंचलन झाले. यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच पालकमंत्री महोदय यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

    या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed