Mumbai CRZ Scam: मालाडच्या एरंगळ, मढ आयलंड, वर्सोवा आणि इतर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवर सरकारी नोंदी बदलून सुमारे १०२ नकाशे बदलण्यात आले आहेत.
हायलाइट्स:
- बांधकामे नियमित करण्यासाठी नकाशांमध्ये फेरफार
- माजी सरकारी कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक
- अठराहून अधिक जणांना चौकशीसाठी समन्स
यातील तीन गुन्हे गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, त्यापैकी दोन गुन्हे शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोंदविण्यात आले आहेत. तर, एक गुन्हा याचिकाकर्ते वैभव ठाकूर यांनी दाखल केला आहे. एक गुन्हा खेरवाडी पोलिस ठाण्यात दाखल असून, उपअधीक्षक, भूमी अभिलेख मुंबई उपनगरच्या अधिकाऱ्यांनी नोंद केला आहे. गुन्हे दाखल करून कोणतीच कारवाई होत नसल्याने वैभव ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणात विशेष पथक स्थापन करून तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिस सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून गेल्या आठवड्यात चार जणांना अटक केली.
८०० हून अधिक नकाशांची तपासणी हा सीआरझेड घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. भूमी अभिलेख कार्यालयामध्ये असलेल्या ८०० पेक्षा अधिक नकाशांची तपासणी केली जात आहे. आरोपींनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने १०२ मालमत्तांच्या नकाशांमध्ये खोटे सिटी सर्व्हे क्रमांक, अस्तित्वात नसलेली बांधकामे आणि बदललेली सीमा यांसारखे बनावट तपशील समाविष्ट करून नोंदींमध्ये फेरफार केल्याचे तपासात निदर्शनास आले. यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

