मुंबई, दिनांक ३: शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात आज शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या दुरूस्तीबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक दत्तप्रसाद नडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, या पालखी मार्गाच्या दुरूस्तीचे काम ज्या कंपनीने अपूर्ण ठेवले आहे, त्या कंपनीच्या अनामत रकमेतून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच संबंधित कंपनीवर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
00000
श्रद्धा मेश्राम,स.सं