म.टा. प्रतिनिधी, नागपूर: वेळ रात्री ८.१५ वाजताची. धुळवड शांततेत आटोपल्यानंतर पोलिस रिलॅक्स झाले. पोलिस नियंत्रण कक्षातील रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत चार्ज देण्याची धावपळ सुरू झाली. याचदरम्यान पोलिस नियंत्रण कक्षातील (११२) फोन खणखणला. ‘एसीपी (साहाय्यक पोलिस आयुक्त) व डीसीपीला (पोलिस उपायुक्त) गोळ्या झाडायच्या आहेत. तत्काळ फोर्स पाठवा’, असे सांगत समोरच्याने आपला मोबाइल बंद केला. यामुळे पोलिस नियंत्रण कक्षात तैनात पोलिसांमध्ये खळबळ उडाली.या फोनला गांभिर्याने घेत संपूर्ण पोलिस दल अलर्टमोडवर आले. मोबाइल करणाऱ्याचा शोध सुरू झाला. त्याचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने पोलिसांना लोकशन मिळणे कठीण झाले. पोलिसांनी मोबाइल क्रमांकाच्या आधारे शोध घेतला असता तो पारडीतील रहिवाशाचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. पोलिस त्याच्या घरी जाताच मोबाइल करणारा मद्यधुंद अवस्थेत होता.
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता ‘मला काहीच आठवत नाही’, असे सांगत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याचा नोंद करीत सुटकेचा नि:श्वास सोडला. किसन राठोड, असे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या फोनमुळे तब्बल दीड तास संपूर्ण पोलिस यंत्रणा वेठीस धरल्या गेली होती.