• Mon. Nov 25th, 2024
    भरपूर पाऊस, जगात शांतता, महागाईचं काय? सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक

    सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महायात्रेतील महत्त्वाचा विधी मंगळवारी पहाटे संपन्न झाला. गाईच्या वासराकडून भाकणूक विधी दरवर्षी पार पडतो. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. मानकरी देशमुख यांच्याकडे वासरु भाकणूक विधी संपन्न होतो. वासराने केलेल्या कृतीवरून भविष्यवाणी केले जाते. हिरेहब्बू स्पष्टीकरण केले जाते.

    ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज महायात्रेतील प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन देशात यंदा भरपूर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जगात शांतता राहील, महागाई वाढणार नाही, महागाई स्थिर राहील, असा अंदाज भाकणुकीतून हिरेहब्बू यांनी व्यक्त केला.

    महायात्रेतील तिसरा दिवस

    सोमवारी सिद्धेश्वर महायात्रेच्या तिसऱ्या दिवशी धार्मिक विधी उत्साहात संपन्न झाला. होम मैदानावर विधिवत पूजा करून हिरेहब्बू मंडळींनी कुंभार कन्येस अग्नी देताच सिद्धरामाचा जयघोष झाला. सोमवारी होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा साजरा झाला. सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराजवळ भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला.

    भाकणूक विधीला अनन्यसाधारण महत्त्व

    भाकणूक माध्यमातून वर्षभरात पाऊस पाणी कशाप्रकारे होणार याची शक्यता वर्तवली जाते. सिद्धेश्वर यांच्या यात्रा सोहळ्यात भाकणुकीला विशेष महत्त्व असते. भाकणूक सांगणाऱ्या देशमुख यांच्या वासराला दिवसभर अन्न पाणी देत नाहीत. भाकणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर वासराने मलमूत्र केल्यामुळे वर्षभरात चांगला पाऊस होणार आहे. २०२४ हे पूर्ण वर्ष शांततेत जाणार अशी भाकणूक वर्तवण्यात आली आहे.

    यंदाच्या वर्षी वासरू हे अत्यंत शांत होते. सुरुवातीला वासराने मलमूत्र केले. तसेच गाजराला स्पर्श केले मात्र खाल्ले नाही. वासराच्या या हालचालीवरून २०२४ चे हे वर्ष स्थिर असेल, महागाई वाढणार नाही. तसेच मुबलक प्रमाणात पाऊस असेल असा अंदाज मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, मागच्या वर्षी वासरू हे बिथरलेले होते. त्यावरून मोठे संकट येणार असल्याचा अंदाज मी व्यक्त केला होता. जगाने मोठे युद्ध या वर्षी पाहिले. तसेच यंदाचे वर्ष जरी राजकीय निवडणुकांचे असले तरी या भाकणुकीत राजकीय कोणताही अंदाज व्यक्त करता येत नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *