बारामती, दि. २४ : नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेली विकासकामे आगामी १०० वर्ष टिकतील, त्यांची कमीकमीत देखभाल दुरुस्ती करावी लागेल अशा दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, चिल्ड्रन पार्क, सेंट्रल पार्क, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.
कन्हेरी वनविभाग परिसराचा विकास करीत असताना हवामानानुरुप वाढणारी, कमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. दोन झाडामधील अंतर समान ठेवावे, वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील, तलावाच्या कडेला पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘चिल्ड्रन पार्क’ची कामे करीत असताना मुलांना रात्रीच्या वेळी चांगली दृश्यमानता राहील याचा विचार करुन वीजेचे खांब बसवावेत. बालकांना केंद्रस्थानी ठेवून परिसराची रंगरंगोटी करावी. पदपथाच्या बाजूला कमी उंचीच्या फुलझाडांची लागवड करावी. विकासकामे करताना पदपथावर स्वच्छता राहील, याची काळजी घ्यावी, असे श्री.पवार म्हणाले.
‘सेंट्रल पार्क’ची कामे येत्या दिवाळीअखेर पूर्ण व्हायला पाहिजे. परिसरातील सर्व शासकीय इमारतींसोबत या पार्कसाठी एकत्रित पाणीपुरवठा करण्याचा आराखडा करावा. श्रीमंत बाबू नाईक वाडा व परिसरातील विकासकामातून ऐतिहासिक, पारंपरिक वास्तूंचे दर्शन होईल, अशी विविध छायाचित्रे भिंतीवर लावावी. त्यावर विविधरंगी प्रकाशझोत टाकून ते अधिक आकर्षक दिसतील अशी व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.
बारामती अधिक स्वच्छ, सुंदर, सुविधायुक्त व्हावी यासाठी नागरिकांनीही या विकास कामांना सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळ, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, जय पाटील, बाळासाहेब जाधव, किरण गुजर आदी उपस्थित होते.
000