पुणे, दि.२३ : पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करावे, शासन आणि महापालिकेकडून या संमेलनासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात चिंचवड येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार उमा खापरे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी आणि शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, नाट्य संमेलनाला गौरवशाली परंपरा असून शंभरावे नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत होत आहे. नाट्य संमेलनाच्या माध्यमातून नाट्य चळवळीला गती मिळते. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकारांसह पडद्यामागील कलाकारांचादेखील मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात पाहायला मिळते.
नाट्य संमेलन हा केवळ सोहळा नसून ती एक चळवळ आहे. सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा नाट्य संमेलनाने जपली आहे. ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात या नाट्य संमेलनाचे आयोजन करावे. नाट्य परिषद आणि शासनाकडून यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या ऐतिहासिक नाट्य संमेलनाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नाट्य परिषदेला शासनाकडून मिळालेल्या निधीतून ज्येष्ठ कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा आरोग्य विमा काढण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असेही श्री.सामंत यावेळी म्हणाले.
बालनगरी मंडपाचे भूमिपूजन
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी चिंचवड येथील कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणावर उभारण्यात येणाऱ्या बालनगरी मंडपाचे पूजन उद्योगमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या मंडप उभारणी आणि सजावटीच्या कामाची पाहणीदेखील श्री. सामंत यांनी यावेळी केली.
****