राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला. यावेळी भाजप गणपत गायकवाड यांनी सांगितले की ”येणाऱ्या लोकसभा आणि राज्यातील निवडणुकीत भाजप पक्ष आघाडीवर असेल. तसेच १००% कल्याण आणि भिवंडी लोकसभेत जे आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहतील ते निवडून येतील”, असं गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप कल्याण लोकसभेला आपला उमेदवार देणार का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
यालाच आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देत सांगितलं की ”जोपर्यंत असं वक्तव्य करणार नाही तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही. यांचे वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे”, असं सांगत शिंदे यांनी गायकवाड यांना नाव न घेता टोला लागवला.
दरम्यान, यालाच उत्तर म्हणून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एक्स पोस्ट (ट्विट) करत खासदार श्रीकांत शिंदे यांना खरमरीत उत्तर दिलं आहे. भाजप आमदार गायकवाड आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, ”ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेच बळ मिळालं आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्व जग विदूषक आहे असा भास होतो”, असं गायकवाडांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची बाजू घेतली आणि खासदार शिंदे यांना सल्ला सुद्धा दिला आहे. आमदार पाटील म्हणाले की ”याच्यामागे दोन गोष्टी आहेत नुकतेच लागलेले जे निकाल आहेत त्यात भाजपला भरघोस यश मिळालेलं आहे. यामुळे भाजपची सवय आहे, ते चांगल्या परिस्थितीत असतील तर ते छोट्या पक्षांना दाबायचा प्रयत्न करतात आणि ते इथे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने गायकवाड बोलले असतील तसेच दुसरी बाजू इथले जे खासदार आहे ते इतर पक्षीय आमदारांशी जशा पद्धतीने वागतात त्यामुळे आमदार गायकवाड यांनी तशी भावना बोलून दाखवली. त्यामुळे ती योग्य आहे. लोकांनी आपल्याला ज्या भावनेने निवडून दिलं आहे. हे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात सहा आमदार आहेत. त्यांच्याशी चांगलं वागून त्यांच्या काही सूचनांचा अभ्यास केला तर त्यांना भविष्यात चांगलं पडू शकतं, हा माझा सल्ला आहे त्यांना, परंतु ते असं कधी वागताना दिसले नाही, असं राजू पाटील यावेळी म्हणाले आहेत.