मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील सुधागडमधील नवघर ग्रामपंचायत हद्दीत उंबरवाडी डोंगरावरील जंगलात शनिवारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. यादरम्यान पोलिसांनी परिसरातील मिसिंग केस पडताळण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरड्याची वाडी येथील महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सागर पवार याने जांभूळपाडा पोलीस चौकीत मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन मृत महिलेच्या अंगावरील कपडे कुटुंबाला दाखवले. सागर पवार याच्या कुटुंबियांनी ती सागरची पत्नी कुसबा पवार असल्याचे तात्काळ ओळखले पण पोलिसांना मृत्यूचे कारण समजत नव्हते.
चार दिवसांपूर्वी बेपत्ता तक्रार करणाऱ्या पतीचा उलट तपास केल्यानंतर आणि पोलीसी खाक्या दाखवताच पत्नीचा खून आपणच केल्याचे सांगितले. पाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रोहा विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस, श्वान पथक, RCP टीम, फिंगरप्रिंट टीम, डॉक्टर यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले.
मृत महिलेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. मात्र अद्याप महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट होते. पोलिसांनी मृत महिलेचा पती सागर पवार याची झाडाझडती घेण्यास सुरुवात केल्यानंतर तो काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसी खाक्या दाखवताच सागर पवारने आपणच पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. सागरने कुसबाला दिलेले पैसे तिने परस्पर तिची बहीण आणि भावाला दिले होते. ते पैसे ती परत करत नव्हती. शिवाय वारंवार खर्चाकरिता पैसे मागत होती. सागर याने दुसरे लग्न केले होते. त्यामुळे पहिली पत्नी कुसबा आपल्याला मानसिक त्रास देत असल्याच्या रागात तिचा खून केल्याचा कबुलीजबाब आरोपी सागर पवारने दिला आहे. याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून बायकोच्या खूनप्रकरणी ‘तो मी नव्हेच’ असे भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सागर पवारच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास रायगड पोलीस करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली सुधागड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती चव्हाण करत आहेत