• Sat. Jul 4th, 2026

    मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय घेणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार

    ByMH LIVE NEWS

    Aug 23, 2023
    मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय घेणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार

    ठाणे, दि.23 (जिमाका) : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी, माथाडी यांच्यासाठीही महत्त्वाची संस्था आहे. या सर्व घटकांना विचारात घेऊन लवकरच बाजार समिती आवाराच्या पुनर्विकासासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

    पणनमंत्री श्री. सत्तार यांनी आज वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट दिली. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या सदस्यांबरोबरच विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सदस्य आमदार शशिकांत शिंदे, सचिव श्री. भुसारे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    श्री. सत्तार यांनी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध समस्या व अडचणींची माहिती घेतली. तसेच पुनर्विकास प्रकल्पाचीही यावेळी माहिती घेतली.

    श्री. सत्तार म्हणाले की, कृषि उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निर्माण केली आहे. त्यामुळे त्यास प्राधान्य देण्यात यावे. नियमन मुक्तीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झालेली असली तरी उत्पन्न वाढविण्यासाठी समितीने उपाययोजना सुचवाव्यात. तसेच बाजार समितीची कार्यकक्षा वाढविण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. बाजार समितीच्या आवारातील गाळे अतिधोकादायक झाले आहेत. त्याचा पुनर्विकास करण्याची आवश्यक आहे. त्यासाठी बाजार समिती सदस्य, व्यापारी, माथाडी कामगार यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुनर्विकासासंदर्भात तसेच इतर विषयांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल व याप्रश्नी शंभर दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल.

    बाजार समितीमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. तसेच बाजार समितीने आपल्या कामकाजात संगणकीय प्रणालीचा वापर वाढवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी सभापती श्री. डक व माजी आमदार शशिकांत शिंदे यांनीही यावेळी विविध अडचणी मांडल्या. मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांची पाहणी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed