एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, नितीन देसाई हे मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर रात्री अडीच वाजता ते एन.डी. स्टुडिओत पोहोचले. एनडी स्टुडिओला परतल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला बंगल्याच्या आसपास कोणी फिरू नका, असे सांगितले. तसेच एक व्हॉईस रेकॉर्डर दिला आणि हा रेकॉर्डर माझ्या बहिणीकडे दे, असे देखील त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले. सकाळी आठ वाजेपर्यंत देसाई यांच्या बंगल्यावर कर्मचाऱ्याला कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने व्हॉईस रेकॉर्डर सुरु केला आणि ऑडिओ क्लीप्स ऐकायला सुरुवात केली. पहिल्या ऑडिओ क्लिपचे पहिले वाक्य ऐकून त्याला धक्काच बसला. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’, असे क्लिपमधील पहिले वाक्य होते. हे ऐकताच कर्मचाऱ्याला काहीतरी अशुभ घडल्याचा संशय आला आणि त्याने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. ऑडिओ क्लिप्समध्ये नितीन देसाईंनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या चार व्यावसायिकांची नावं घेतल्याचं समजतं. या क्लिप्समधल्या देसाईंच्या आवाजाच्या नमुन्याची फॉरेन्सिक टीमकडून आधी तपासणी होईल. आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही होईल, असे समजते.
दरम्यान, नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करण्यात आले. चार डॉक्टरांनी हे पोस्टमॉर्टम केलं. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाईंचा मृत्यू गळफास लागल्यामुळेच झाला आहे, असा प्राथमिक निष्कर्ष पोस्टमॉर्टममधून समोर आला आहे. त्यांचा मृतदेहा अद्यापही जे.जे. रुग्णालयातच आहे. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी एन.डी. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याच्या काही तास आधी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे समजते.