काय घडलं?
एका ट्रॅव्हल एजंटने स्वस्त तयार विमानाची तिकिटे काढून देतो असे सांगितले. यासाठी २४ जणांकडून चार लाख दहा हजार रुपये घेतले आणि तिकिटेही दिली. मित्र मैत्रिणींच्या या ग्रुपने श्रीलंकेत फिरण्यासाठी ठिकाणे ठरवली आणि राहण्यासाठी वेगवेगळ्या होटल्समध्येही बुकिंग केली. मात्र ऐनवेळी एजंटने दिलेली तिकिटेच बनावट निघाली आणि हॉटेल बुकींचे पैसे वाचविण्यासाठी तात्काळ तिकिटांचा भुर्दंड सहन करून श्रीलंकेत जावे लागले.
कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात ७३ वर्षीय ट्रॅव्हल्स एजंट आहेत. ते वेगवेगळ्या देशात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करून देणाऱ्या सहली आयोजित करतात. त्यांच्याकडील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी श्रीलंकेला जाण्यास कोणी उत्सुक आहे, असे विचारले. पाहता-पाहता २४ जण तयार झाले. त्या सगळ्यांची ट्रॅव्हल्स एजंटने त्यांच्या तिकीट बुकिंग पासून श्रीलंकेत इतर व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी घेतली. त्या एजंटने विमानाची तिकिटे काढण्यासाठी अॅपवरून एका एजंटचा शोध घेतला. सागर वशिष्ठ नावाच्या एजंटने माफक दरात तिकिटे काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी ग्रुपमध्ये सागरचा संपर्क क्रमांक शेअर केला. त्याच ग्रुपच्या माध्यमातून २४ जणांनी त्यांची कागदपत्रे आणि पैसे पाठविले. त्या सागरने २४ जणांची तिकिटे काढली. त्यानंतर श्रीलंकेतील फिरण्याची ठिकाणे आणि हॉटेलचेही बुकिंग केले. श्रीलंकेत जाण्यापूर्वी तिकिटे दिली, मात्र ही सर्व तिकिटे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मात्र श्रीलंकेतील हॉटेल्समध्ये बुकिंग केले होते. ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून २४ जणांनी तात्काळ कोट्यातून विमानाची तिकिटे काढली.
श्रीलंकेची सहल करून परतल्यावर सर्वांनी सागर याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच संपर्क झाला नाही. याप्रकरणी चार लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.