• Tue. Jun 9th, 2026

    सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2023
    सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 10 : सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्त्व आहे. तेथील ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करावा. जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांशी चर्चा करून विविध विकासकामांचा अंतर्भाव असलेला परिपूर्ण विकास आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासंदर्भात आज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंदखेड राजा येथे सहा राज्य संरक्षित स्मारके आणि पाच केंद्र शासन संरक्षित स्मारके आहेत. यामध्ये राजे लखुजी जाधव राजवाडा, निळकंठेश्वर मंदिर, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सावकार वाडा, रंगमहाल, काळा कोट, मोती तलाव, रामेश्वर मंदिर, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणांचा समावेश आहे. या स्थळांसह परिसर विकासाच्या बाबतीत एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व लक्षात घेतच तेथील कामांचे नियोजन  होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी स्थानिक यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

    सध्या या स्थळांच्या विकासासाठी १६८ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय तेथील संग्रहालयाच्या विकास कामांचा ३४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या परिसराचे आणि स्थळाचे महत्त्व लक्षात घेता विविध यंत्रणांच्या मदतीने एकत्रित असा  आराखडा आवश्यक आहे. त्यादृष्टीने लवकर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

    यावेळी प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या.

    0000

    दीपक चव्हाण/विसंअ/

    Chandrapur News: हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ
    मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन
    Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed