• Sat. Mar 7th, 2026

    शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…

    शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…

    अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचा विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. तसंच अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून शिंदे सरकारला समर्थन करणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ही खदखद जाहीररित्या बोलून दाखवली आहे. तसंच कडू यांनी भाजपवरही घणाघाती टीका केली आहे.

    ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांची नाराजी साहजिकच आहे. राष्ट्रवादी आमच्यावर अन्याय करत आहे, असं सांगत हे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. मात्र आता राष्ट्रवादीच भाजपसोबत आल्याने आता मोठी अडचण झाली आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला साथ देऊन चूक केली, अशी भावना या आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. जी नवी युती केली त्याबद्दल विचारविनिमय केला जायला हवा होता. माझी देखील घटकपक्ष आहोत, पण आम्हालाही सांगितलं जात नाही. ठीक आहे, तुमची संख्या आता वाढत चाललीय, त्यामुळे तुम्ही आम्हाला विचारणं बंद केलं असेल, ही गोष्ट वेगळी आहे. एकमेकांप्रती विश्वासघात होत असेल, विश्वास ठेवला जात नसेल तर त्याचे परिणाम आज दिसत नसतील तर भविष्यात नक्कीच दिसतील,’ असा आक्रमक इशारा बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे.

    मुश्रीफ भाजपच्या वळचणीला तर गेले पण फडणवीसांचा चेला म्हणतो, २०२४ ला बरोबर कार्यक्रम करतो!

    ‘अजितदादा अडचणी निर्माण करणार’

    उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होताना शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून आम्हाला निधी देत नसल्याचं कारण दिलं होतं. मात्र आता हेच अजित पवार नव्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्याने सत्ताधारी आमदारांनी धास्ती घेतली आहे. ‘शिवसेनेच्या आमदारांचा गट दोन्ही बाजूने फसला आहे, त्यांचा चेंदा-मेंदा झाला आहे. कारण सहा महिन्यांपूर्वी हे काय सांगत होते की, राष्ट्रवादीने आमची अडचण केली आहे आणि आता हीच राष्ट्रवादी सत्तेत आलीय. त्यामुळे निधी असेल किंवा इतर कामं, दादा जर तिथे असेल तर अडचण येणारच आहे. त्यामुळे हे आमदार अडचणीत आले आहेत,’ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

    ‘हे राजकारण फार काळ टिकणार नाही’

    ‘काहीही होवो, आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे, असा भाजपचा विचार आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आलेले लोक खड्ड्यात गेले तरी चालतील, असा त्यांचा विचार आहे. भाजपला काहीही करून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. पण माझ्या मते, यामुळे भाजपचं जास्त नुकसान होईल. तुमच्यासोबत आलेल्या माणसांचं काय होईल, त्याची काय अडचण होईल, याचा विचार न करता राजकारण केलं तर हे फार जास्त काळ टिकत नाही,’ असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed