दिंडोरी रोडवरील एका खासगी शाळेची बस (एमएच १५ जीएन ४२९१) दुपारी तीनच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना, बसचालकास अचानक फिट आली. चालकाचा बसवरील ताबा गेल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षाला धक्का लागला. बस ही दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी बिल्डिंगसमोरील बाजूस असलेल्या पथमार्गावर गेली. येथे उभ्या असलेल्या दुचाकीला धडक बसून तीदेखील या बसखाली आली. दुपारच्या उन्हामुळे पथमार्गावर बसणारे भाजीपाला, फूल, कटलरी साहित्य आदींची विकणारे विक्रेते सावलीत दुकानापासून दूर होते. यामुळे जिवीतहानी टळली. या बसमध्ये खासगी शाळेची लहान वीस ते बावीस विद्यार्थी होते. त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. अपघातस्थळी म्हसरूळ येथील ग्रामस्थ तसेच आजूबाजूला रस्त्यावरून जाणाऱ्यांनी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. फिट आलेल्या बसचालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले. विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये बसविण्यात आले.
सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र, रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षा व दुचाकीला बसने धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले. तसेच पथमार्गावर फूल, कटलरी आदी साहित्य विकणाऱ्या दुकानावरून बस गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.