• Mon. Nov 25th, 2024

    ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jun 20, 2023
    ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

    पुणे: दि.२० : ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि  विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी कॅट्रिअना जॅक्सन, सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थितीत होते.

    या परिषदेला ४७ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेले महत्वाचे घटक यानिमित्ताने जागतिक स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र येतात. त्यासोबतच स्थानिक स्तरावर महाविद्यालयांशी निगडित बाबींवरही  चर्चा होते.  कोविड, आर्थिक आणि भुराजकीय समस्या, शिक्षणाची उपलब्धता आणि समान संधीची वाढती मागणी, ऑनलाईन शिक्षणाची तातडीची गरज, पर्यावरण बदल आणि तंत्रज्ञान विषयक समस्या हे आजचे वास्तव आहे . या बदलत्या शैक्षणिक वातावरणावर व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    पुणे हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा पुण्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत. पुण्यात १५ विद्यापीठे आणि ४५० पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शहर असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आजपर्यंत ६ लाखांहून अधिक विद्यार्थी देशातील सर्व राज्यांतून तसेच ८५ वेगवेगळ्या देशांतून येथे आलेले आहेत. यामुळेच शहरामध्ये लक्षणीय रोजगार निर्माण झालेला आहे. परिणामी पुण्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.  विद्यापीठांच्या माध्यमातून बहुशाखीय आणि विद्यार्थ्याला सक्षम बनविणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

    श्री. श्रृंगला म्हणाले,  ‘जी-२०’ च्या अंतर्गत राबविण्यात येणारा जनभागीदारी हा लोककेंद्रीत कार्यक्रम असून त्याचा पाया ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ आहे. या जनभागीदारीमध्ये एकूण २ कोटी ३० लाख व्यक्तींनी सहभाग नोंदवलेला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जी-२० परिषदेच्याच्या बैठका अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत आहेत. पुढील दोन महिन्यांत आणखी काही बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. जी-२० संवाद आणि ‘युनिव्हर्सिटी २०’ परिषद या दोन्ही मध्ये समन्वय असल्याचे देखील श्री. श्रृंगला म्हणाले.

    मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅक्सन म्हणाल्या, ‘युनिव्हर्सिटी-२०’ कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा हा सुवर्णकाळ आहे. उच्च शिक्षणासाठी दोन्ही देशांचा परस्पर सहकार्याचा इतिहास आहे. दोन्ही देशांसाठी शिक्षण हे सर्वात आश्वासक क्षेत्र आहे. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया १०० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, विज्ञान आदी विषयांच्या अभ्यासासाठी भारतात पाठवणार आहे, असेही श्रीमती जॅक्सन म्हणाल्या.

    डॉ. मुजुमदार म्हणाले, देशातील विद्यापीठांनी शिक्षणात आधुनिक शिक्षणात मानवी मूल्यांचा तसेच नैतिक शिक्षणाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाबरोबरच दर्जेदार नैतिक शिक्षण देणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

    डॉ. विद्या येरवडेकर आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी प्रास्ताविक केले.

    या परिषदेची संकल्पना ‘विद्यापीठांचे भविष्य- जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनविण्यासाठी विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका’ अशी आहे. परिषदेला विविध देशातील विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

     

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *