‘युवा सेनेने शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे. तसेच आता अन्य विद्यार्थ्यांकडून माझ्या विरोधात प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. त्यांच्यावरही दबाव आणला जात आहे. त्यांनाही निकाल देणार नसल्याचे सांगितले जात आहे’, असा आरोपही सोनमने केला आहे.
दरम्यान, संबंधित कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांनी केली आहे. ‘केवळ एका विद्यार्थ्यावर अकरावीचा वर्ग चालविण्यास कशी परवानगी दिली? तसेच कॉलेजमध्ये पुरेसे विद्यार्थी आणि शिक्षक नसताना या कॉलेजला परवानगी कशी मिळाली’, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.
दरम्यान, कॉलेजच्या प्राचार्यांनी आरोप फेटाळले. ‘विद्यार्थिनीची हजेरी नसल्याने तिला परीक्षेला बसू दिले नाही. तसेच तिचे वर्तन चांगले नसल्याने तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे’, असे प्राचार्य प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. ‘याप्रकरणी शिक्षण निरीक्षक नवनाथ वनवे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल’, असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी नमूद केले.
दाखला घेण्याचा आग्रह
‘माझी हजेरी नसल्याचे सांगून आता परीक्षेला बसू दिले जात नाही. माझ्या कुटुंबीयांनी हजेरी पत्रकाची मागणी केल्यावर तेही देण्यास नकार दिला. तसेच परीक्षाही घेणार नाही, असे प्राचार्यांनी सांगितले. आता मी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्यावर मंगळवारी व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवून दाखला घेऊन जायला सांगितले आहे. मात्र मी त्याला नकार दिला आहे. परीक्षा न घेतल्यास माझे एक वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे परीक्षा घेऊन पुढील वर्षासाठी अन्य कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ द्यावा’, अशी कैफियतही सोनमने मांडली.