• Sun. Jun 28th, 2026

    महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

    ByMH LIVE NEWS

    Mar 10, 2023
    महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. 10 : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500  कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

    या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

    राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

    भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 14 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 14 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

    यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 15 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.

    यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 15 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी दहा वर्षांचा असेल.

    रोख्यांचा कालावधी 15 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 15 मार्च, 2033 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 15 सप्टेंबर व 15 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

    शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 9 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

    ००००

    दीपक चव्हाण/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *