• Wed. Nov 27th, 2024
    विधान परिषद प्रश्नोत्तरे

    ‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी

    विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. ३ : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

    कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

    यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

    000

    दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    अक्कलकुवा  तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ/

    इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील ७ किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/ससं/

    गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे २०२४ पर्यंत

    पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

    गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/ससं/

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed