• Sat. Sep 21st, 2024

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

ByMH LIVE NEWS

Sep 30, 2022
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

मुंबई, दि. 30 – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येईल. 2 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हीडिओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय करून देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेटस् चेंज’ हा 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हीडिओ संदेशाद्वारे देखील कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होईल. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छता मॉनिटर’ यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

000

ब्रीजकिशोर/विसंअ/30.9.2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed