• Fri. Sep 4th, 2026

महाराष्ट्र सदनातील भव्य गणेशोत्सवाचे राज्यपालांना निमंत्रण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 4, 2026

नवी दिल्ली, दि. ४ : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमंत्रण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी दिले. यावेळी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही त्यांना देण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या गणेशोत्सवातून राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचे दिमाखदार दर्शन घडणार आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक, त्यानंतर सकाळी ११ वाजता विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सायंकाळी जुन्या महाराष्ट्र सदनात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती होणार आहे.

उत्सवात मराठी नाट्य, चित्रपटगीते, गझल, लोककला, लावणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व अन्य कलाकारांचा गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘सही रे सही’ सादर होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा विशेष कार्यक्रम, तर १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम रंगणार आहे.

१९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा मराठी गझल कार्यक्रम होईल. २० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरद दाते व अन्य गायकांचा ‘मराठी चित्रपट गीते हा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय पाककला स्पर्धा, भरतनाट्यम, खेळ पैठणीचा, लावणी तसेच हिंदी-मराठी गायन आणि नृत्याचे विविध कार्यक्रमही उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी झांज पथकासह श्रींच्या भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. जुन्या महाराष्ट्र सदनातून निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होणार आहेत.

उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. दिल्लीतील नागरिक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्ती, परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचा हा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

0000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed