• Mon. Aug 31st, 2026

Dr Rajendra Rupnawar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने मुंबईत जीवन संपवलं, नातेवाईकांचा रूग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉ. रुपनवर यांच्या मृत्युनंतर फलटणसह त्यांचे मूळ गाव असलेल्या माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच माळशिरस तालुक्यातील डॉ. रूपनवर यांच्या गावातील नागरिकांनी फलटणकडे धाव घेतल्यामुळे फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, नातेवाईक डॉ. रुपनवर यांचे पार्थिव घेवून मुंबईहून फलटणच्या दिशेने येत आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक न झाल्यास डॉ. रुपनवर यांच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला असल्याचे समजते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीला डॉ. मदने या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी केले होते गंभीर आरोप

गेल्या महिन्यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधितांनी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र डॉ. रुपनवर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या संबंधितांनी डॉ. रुपनवर यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली होती.

डॉ. रुपनवर यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित लोकांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी त्यांच्यावरच कारवाई करीत त्यांचे वेतन रोखले होते. या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर वरिष्ठांनी केलेल्या पिळवणुकीबाबत व्हिडिओ प्रसारित करुन मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच काही लोकांची नावे त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नमूद केली होती.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य

डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी कुणाचं नाव घेतलं होतं?

माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोंडे-देशमुख, असे डॉ. रूपनवर यांच्या तळहातावर लिहलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील मानसिक ताण आणि कामाच्या परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न आणि खळबळजनक दावे केले आहेत.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, डॉ. राजेंद्र रुपनवर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाले आणि शासकीय सेवेत रुजू झाले. फलटण उपजिल्हा रुग्णालयात ते कार्यरत होते. साधारण दीड महिन्यापूर्वीही डॉ. रुपनवर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आपण सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तक्रार केल्यास पुन्हा नोकरीवरून काढून टाकले जाईल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जाईल, अशी भीती असल्याने डॉ. रूपनवर बोलण्यास तयार नव्हते, असा दावा त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.

डॉ. रुपनवर यांनी यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करताना आपल्या मृत्यूस कोण जबाबदार आहेत, ती काही नावे तळहातावर लिहिली होती. मात्र, अखेरचा जबाब देताना त्यांनी, ‘माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मृत्यूनंतर माझा देह एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान करण्यात यावा’, अशी इच्छा त्यांनी जबाबात व्यक्त केली होती, असेही अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तसेच तो जबाब त्यांनी स्वखुशीने दिला होता की त्यामागे कोणता दबाव होता? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.

या घटनेच्या निमित्ताने फलटणच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांवर नेमका किती मानसिक ताण आहे? कामाच्या ठिकाणी कोणत्या समस्या निर्माण होत आहेत? आणि डॉक्टर वारंवार मानसिक दडपणाखाली का येत आहेत? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे. दीड महिन्यापूर्वी डॉ. रुपनवर यांनी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला असता, तर मी त्यांच्यासाठी काही तरी करू शकले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा