• Fri. Aug 28th, 2026

Crime News: रात्री पोलीस गस्तीवर होते, गुप्त टीप मिळाली अन् कट उधळला; चिकलठाणा पोलिसांकडून १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील वरूड शिवारात चिकलठाणा पोलिसांनी मध्यरात्री ऑलआऊट आणि कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत अवैध गोवंश कत्तलीचा कट उधळून लावला आहे. शेत गट नंबर ३२३ मधील एका गोठ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर व अमानुष रितीने डांबून ठेवलेल्या ५ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि कत्तलीचे साहित्य जप्त केले आहे.

​युसूफ खान आणि जावेद युसूफ खान (दोघे रा. वरूडकाजी शिवार) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात ऑलआऊट ऑपरेशन राबवत होते. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून वरूड शिवारात अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला. तेथे आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अमानुष रितीने, विना चारा-पाण्याचे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

​जनावरांची गोशाळेत रवानगी; दोन आरोपींवर गुन्हे दाखल

पोलीस पथकाने जागेवरच ५ गोवंश जनावरे आणि कत्तलीसाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिकलठाणा येथील गोशाळेत सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी सलमान युसूफ खान आणि जावेद युसूफ खान या दोन आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे व त्यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.