• Thu. Aug 27th, 2026

लेक लाडकी योजना; मुंबईतील ३ हजार ५६३ लाभार्थींना मिळणार लाभ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 27, 2026

मुंबई, दि. २७ : मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी, शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासन ‘लेक लाडकी योजना’ राबवित आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील 671 आणि मुंबई उपनगरातील दोन हजार 892 अशा एकूण तीन हजार 563 लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करुन राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतरच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” सुरु करण्यात आली आहे. ही योजना पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा तद्नंतर जन्मलेल्या मुलींकरिता लागू आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा अधिक नसावे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील मुलींना शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी या योजनेतून टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये, इयत्ता सहावीत प्रवेशानंतर सात हजार रुपये आणि इयत्ता अकरावीत प्रवेशानंतर आठ हजार रुपये दिले जातात. मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 75 हजार रुपयांचा अंतिम लाभ देण्यात येतो. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अंतिम लाभ मिळण्यासाठी मुलीने 18 वर्षे पूर्ण केलेली आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे.

1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना योजनेचा लाभ लागू आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी या लाभासाठी पात्र राहील. कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

पात्र मुलींच्या पालकांनी जन्मनोंदणी व जन्मदाखल्यासह आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्यामार्फत पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. लाभार्थींची माहिती ऑनलाइन प्रणालीत नोंदवून संबंधित स्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो.

अर्जासाठी मुलीचा जन्मदाखला, पालकांचे व लाभार्थी मुलीचे आधार कार्ड, पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी किंवा पालकांच्या बँक पासबुकची प्रत आणि संबंधित टप्प्यासाठी शाळेचा बोनाफाईड दाखला आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र तसेच शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेली अन्य कागदपत्रेही सादर करावी लागतील. पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत.

अधिक माहितीसाठी

https://icds.gov.in/en/schemes/lek-ladki-yojana

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed