रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.२७ :- गणेशोत्सवाच्या आनंदात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वीज पुरवठ्यापासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि सुरक्षेपासून आपत्कालीन मदतीपर्यंत प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करावे. दहीहंडीच्या आयोजनात सुरक्षेच्या उपाययोजनांची पूर्तता झाल्याशिवाय परवानगी देऊ नये तर मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिल्या. जिल्हा नियेाजन भवन सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, तहसिलदार चंद्रसेन पवार आदि उपस्थित होते.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज, मुबलक प्रमाणात पाणी तसेच वाहतूक व सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळावी, यासाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागातील पर्यायी मार्गांचा वापर करताना आवश्यक ठिकाणी वाहतूक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. एखादे वाहन बिघडल्यास ते तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. प्रवाशांसाठी पाणी, चहा-पाणी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. गोगावले यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, शांतता समितीच्या सदस्यांचे पुढील तीन दिवसांत पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण करून त्यांना आवश्यक ओळखपत्रे देण्यात यावीत. जिल्ह्यातील स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी या स्थानिक रेस्क्यू टीम्स महत्त्वाची मदत करतात, त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची मदत उपलब्ध होईल, अशा पद्धतीने पूर्वसमन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सुविधा केंद्रांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवावी आणि ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावीत. दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. दहीहंडी उत्सवासाठी परवानगी देताना सुरक्षेच्या उपाययोजना, विशेषतः सेफ्टी बेल्टची उपलब्धता ही अनिवार्य अट ठेवावी आणि ती पूर्ण केल्याशिवाय परवानगी देऊ नये. वाहतूक वळविण्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, जेणेकरून रायगडबाहेरील प्रवाशांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी 7 पोलीस उपनिरीक्षक, 128 पोलीस अधिकारी, 1 हजार 900 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड तसेच एसआरपीएफची 1 कंपनी तैनात करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 25 मोटारसायकल, 20 टोईंग क्रेन आणि 20 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आतापर्यंत 36 शांतता समिती बैठका, 30 मोहल्ला समिती बैठका, 137 गणेश मंडळांच्या बैठका आणि 125 गावबैठका घेण्यात आल्या आहेत.
गणेशभक्त व प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर या ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी आवश्यक सुविधा, वाहन विश्रांतीची व्यवस्था तसेच टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
00000