मुंबई, दि. २३ : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
मंत्री आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सुसूत्र आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आपल्या गरजेनुसार योग्य आरोग्य संस्थेची निवड करणे सुलभ होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास आणखी दृढ होणार आहे.
रुग्णालयाच्या क्षमतेनुसार उपचारांची स्पष्ट व्यवस्था
ग्रामीण रुग्णालयापासून ३०, ५० व १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा विविध स्तरांवर उपलब्ध होणाऱ्या सेवांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णालयाची क्षमता आणि सेवा स्तर लक्षात घेऊन तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, नर्सिंग, अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळ, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी आणि इतर रुग्णसेवांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे.
फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंतशल्यचिकित्सक आदी तज्ज्ञ सेवांचा रुग्णालयाच्या स्तरानुसार समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्यास चालना मिळणार असून, रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे.
३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची सुविधा
नागरिकांना आवश्यक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निदानात्मक सेवांचेही स्पष्ट मानक निश्चित करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६, १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११०, तर जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या तीन स्तरांवर मिळून ३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांबाबत स्पष्टता झाली आहे. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्य तपासण्या, लिपिड प्रोफाइल, HbA1C, थायरॉईड, पॅप स्मिअर तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे.
एक्स-रेपासून एमआरआयपर्यंत आधुनिक निदान सुविधा
रुग्णालयाच्या स्तरानुसार एक्स-रे आणि सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन, तर जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय सुविधेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे गंभीर आजारांचे निदान अधिक वेगाने आणि अचूक पद्धतीने करण्यास मदत होणार असून, नागरिकांना आधुनिक निदान सुविधांचा लाभ शासकीय आरोग्य व्यवस्थेतच मिळणार आहेत.
कुशल मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेला बळ
गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांसोबत प्रशिक्षित नर्सिंग आणि पॅरामेडिकल मनुष्यबळाचे रुग्णालयनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढीतील मनुष्यबळ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते आदींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातूनही सार्वजनिक आरोग्य संस्थांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, १,५१९ स्पेशालिस्ट, २,९१९ वैद्यकीय अधिकारी, ३,००५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११,५७१ स्टाफ नर्स यांचा समावेश आहे.
रुग्णालयाच्या स्तरानुसार अत्यावश्यक औषधांची यादी आणि आवश्यक औषधसाठ्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराच्या वेळी आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करता येणार आहे.
माता-बाल आरोग्य, डायलिसिस आणि रक्तसेवांनाही प्राधान्य
रुग्णालयनिहाय मानकांमध्ये केवळ डॉक्टर आणि निदानात्मक सेवांचाच समावेश नसून रक्तपेढी व रक्त संक्रमण केंद्र, डायलिसिस, आयुष सेवा, लसीकरण कक्ष, माता-बाल आरोग्य सेवा आणि प्रसूती कक्ष यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.
रुग्णवाहिका, दिव्यांग प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, डिस्चार्ज प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, आहार सुविधा आणि तक्रार निवारण व्यवस्था अशा नागरिकाभिमुख सेवांनाही महत्त्व देण्यात आले आहे.
आरोग्यसेवेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना
“नागरिकाला कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, कोणत्या तपासण्या होतील आणि कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, याची स्पष्ट माहिती मिळणार असल्याने नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
०००
यासंदर्भातील शासन निर्णय 👇🏾