नाशिक, दिनांक : 22 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): गावातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी जन आरोग्य समिती सदस्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. गावातील आजारी व गंभीर आजारांच्या रुग्णांची ओळख करून त्यांना आवश्यक तपासणी, उपचार आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या लाभाशी जोडण्यासाठी समित्यांनी लोकप्रतिनिधी व आरोग्य यंत्रणेशी समन्वयाने काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री श्री. आबिटकर यांनी जिल्हास्तरीय विविध समिती सदस्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, राज्य आरोग्य यंत्रणेचे कार्यकारी संचालक डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सदस्यांशी संवाद साधून आरोग्य व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, गावाचा विकास हा केवळ भौतिक सुविधांच्या उभारणीपुरता मर्यादित नसून गावातील नागरिक निरोगी असणे हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपातळीवरील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विकासकामांसोबतच गावातील नागरिकांच्या आरोग्याचीही माहिती घेतली पाहिजे. गावामध्ये कोण आजारी आहे, कोणाला गंभीर आजार आहे, कोणाला नियमित औषधोपचाराची गरज आहे, कोणाची आवश्यक तपासणी झालेली नाही, तसेच कोणता रुग्ण उपचारांपासून वंचित आहे, याची माहिती घेऊन संबंधित व्यक्तीला आरोग्य सेवांच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. संशयित रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी योग्य आरोग्य संस्थेकडे संदर्भित करावे. रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहोचला की त्याचे काम संपत नाही, तर त्याला पुढील आवश्यक उपचार मिळत आहेत का, याचाही पाठपुरावा समित्यांनी करावा.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना या नागरिकांसाठी महत्त्वाच्या आरोग्य योजना आहेत. पात्र रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सक्रियपणे काम करावे. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना योजनांचा व्यापक वापर झाल्यास नागरिकांना उपचारासाठी आर्थिक आधार मिळण्याबरोबरच आरोग्य संस्थांचे बळकटीकरण होईल. या माध्यमातून आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक सुविधा आणखी सक्षम करण्यास मदत होईल, असे मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक तपासणी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आवश्यक बाबींचा पाठपुरावा करून स्थानिक पातळीवरच शक्य तितक्या आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. ग्रामस्तरावरील समित्यांच्या बैठका नियमित झाल्या पाहिजेत. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य संस्थांमधील कामकाज, उपलब्ध सुविधा, रुग्णसंख्या, उपचारांचा लाभ आणि स्थानिक समस्या यांचा आढावा घेण्यात यावा. समिती सदस्यांनी आपले अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेऊन त्यानुसार सक्रिय काम करावे. जन आरोग्य समित्यांच्या सदस्यांना त्यांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी समिती सदस्यांचे प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.
उपलब्ध मनुष्यबळ, औषधे, उपकरणे, तंत्रज्ञान, शासकीय आरोग्य योजना, खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि स्थानिक समित्या यांचा समन्वय साधून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गावातील रुग्ण शोधणे, त्यांना योग्य उपचारांशी जोडणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि आरोग्य संस्थांच्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणे या सर्व प्रक्रियेत समिती सदस्यांनी सक्रिय भूमिका बजावल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास मंत्री श्री. आबिटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी मत्री श्री. आबिटकर यांनी नामपूर ग्रामीण रूग्णालय, दिंडोरी ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नवीबेज, ग्रामीण रूग्णालय देवळा, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तपोवन, सिन्नर ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदूर, प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाडी यांच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाची माहिती घे