• Fri. Aug 21st, 2026

Nagpur News : पत्नीच्या भेटीगाठीच्या संशयातून वाद विकोपाला, कुख्यात बदमाशाला संपवलं, पोलिसांनी आरोपीच्या फिल्मी स्टाईल नांग्या ठेचल्या

नागपुरात एका कुख्यात बदमाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पत्नीच्या भेटीगाठीच्या संशयावरुन वाद विकोपाला गेला आणि त्यात तरुणाला संपवण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीची दीड किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग करत अटक केली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी जुन्या वादातून कुख्यात बदमाशाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. गौरव पंकज रगडे (वय २५) असे मृताचे नाव आहे. गौरव रामभाऊ राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पसार होणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गौरव रगडे आणि आरोपी गौरव राऊत या दोघांविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रगडे हा नुकताच एका हत्या प्रकरणात जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. दरम्यान, गौरव राऊत आणि गौरव रगडेच्या पत्नीची छत्रपती चौक परिसरात ‘क्लाउड किचन’ नावाने रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी सुरू होती. यासाठी गौरव राऊतने परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. गौरव राऊत आणि त्याचा पत्नीच्या भेटीगाठींबाबतची माहिती गौरव रगडेला मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

रगडेला संशय, गौरव राऊतच्या घरी गेला

गुरुवारी रगडेला त्याची पत्नी गौरव राऊतच्या खोलीत असल्याचे संशय होते. त्यामुळे गौरव रगडे हा गौरव राऊत राहत असलेल्या खोलीत पोहोचला. त्यावेळी गौरव राऊत आपल्या काही मित्रांसोबत दारू पित होता. दारूच्या नशेत रगडेने गौरव राऊतला शिवी दिली. तसेच खोलीत तोडफोड करून काचा फोडल्या. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

राऊतने रगडेला संपवलं

हाणामारीनंतर गौरव रगडे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. राऊतने त्याचा पाठलाग केला. नरेंद्रनगर पुलाजवळ गौरव रगडे खाली पडताच राऊतने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेला रगडे घटनास्थळीच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला.

पोलिसांनी पसार होणाऱ्या आरोपीला पकडलं

याचदरम्यान अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मनीष भलमे आणि नरेश सावनकर परिसरात गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. मनीष भलमे घटनास्थळी थांबले, तर नरेश सावनकर यांनी पसार होणाऱ्या आरोपीचा पाठलाग सुरू केला. तब्बल दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्यांनी गौरव राऊतला पकडले. त्याच्याकडून हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. या घटनेचा तपास सुरू असून, हत्येमागे अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, ज्या ठिकाणी वादाची सुरुवात झाली तो परिसर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र नरेंद्रनगर पुलाजवळील हत्येचे ठिकाण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.