• Wed. Aug 19th, 2026

शिळ्या पाण्याची गोष्ट…! थेंब वाचवला… थेंब जमवला… – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 19, 2026

पैसा वाचवला म्हणजेच पैसा कमावला अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. ती सर्वच बाबतीत तंतोतंत जुळते मग ती बचत पैशांचीच असायला पाहिजे असे नाही तरी ऊर्जा बचत, इंधन बचत आणि पाण्याबाबतही लागू होते.

आपण जलसंधारणाचा विचार करतो त्यावेळी केवळ पाणी अडविणे आणि पाणी जिरवणे पर्यंत मर्यादीत ठेवता कामा नये. पाणी अडविण्यासाठी बांध-बांधणे, धरणे आणि तलाव निर्मिती करणे, पाणलोट क्षेत्र तयार करून पाणी जमिनीत मुरवणे हे सामान्य व्यक्तीचे काम असत नाही. त्यासाठी यंत्रणा, जनसहभाग, यंत्रसामुग्री आदींचा वापर करावा लागतो.

प्रामाणिक पर्यावरणप्रेमी नागरिक या भूमिकेतून आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याला नेमकेपणाने बचत कशी करणे शक्य आहे याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. ही माहिती जाणून घेतल्यानंतर आपण कशा प्रकारे यात सहभाग देवू शकतो याचा आपल्याला अंदाज येईल आणि ती कृतीत उतरविणे शक्य होईल.

थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीत एक म्हण आहे. याचा दुसरा अर्थ पाण्याच्या प्रत्येक थेंबाच मोल जाणून घेऊन त्या प्रत्येकाची बचत म्हणजे आपण कमावलेले पाणी होय.

माझं शेत माझं पाणी म्हणत शेती करताना त्याला लागणाऱ्या आवश्यक पाण्याचीही शेती करण्याची संकल्पणा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून समोर आणली आणि त्याला उत्सफूर्त जनप्रतिसाद मिळाला व यातून राज्यात ज्या जिल्ह्यात वर्षातून केवळ एकाच हंगामात शेती शक्य होती त्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दोन हंगाम तर काही ठिकाणी बारमाही ३ हंगाम शेती शक्य झाल्याचे चित्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही पर्जन्यछाया (अवर्षण प्रवण) असलेल्या जिल्ह्यात बघायला मिळाला.

आता जलसंधारण विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार २.० ची प्रगती याच दिशेने होत आहे. पाऊस एकाच हंगामात पडत असला तरी शेतातील काही भागात शेततळी तयार करून पाणी साठवून दुसऱ्या हंगामात देखील शेती करता येते. काही ठिकाणी तर या शेततळ्यांसाठी असलेल्या जागेतून शेतकरी मत्स्यव्यवसाय देखील करू लागले आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्नात वाढ आणि अधिक नफा देखील मिळायला लागला.

आपण नागरिक म्हणून काम करू शकतो याचा जर विचार केला तर छतावर पडणारं पाणी जमिनीखाली टाक्यांमध्ये साठवण्याचा एक पर्याय आहे. दुसरा उत्तम पर्याय म्हणजे छतावर पडणारं हे पाणी विहिरी आणि विंधन विहिरी (बोअर) च्या माध्यमातून भूजलात सोडणे हा आहे. यामुळे जमिनीखालील पातळी अर्थात भूजलस्तर झपाट्याने वाढतो हे सिद्ध झाले आहे.

पाण्याचे मोल जाणणे म्हणजे त्यासाठीची प्रक्रिया आपण समजून घ्यावी. आपल्याकडे जे घरात नळाद्वारे पेयजल येते ते शुद्धीकरण संयंत्रात प्रक्रिया करून घरापर्यंत आणले जाते. यात शुद्धीकरण आणि पाईप लाईन्स, पाण्याच्या टाक्या यांचा खर्च असतो. हे प्रक्रिया केलेले शुद्ध पेयजल आपण किती गांभीर्याने वापरतो हे आपण बघावे.

घराबाहेर, प्रवासात आपण हेच पेयजल २० रूपये लिटरने घेतो म्हणजे घरात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यालाही मोल आहे ते देखील आर्थिक रूपात आहे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

सामान्य नागरिक म्हणून पाण्याची बचत करण्याचे छोटे आणि सोपे उपाय सर्वांनी केले पाहिजे. प्रक्रिया करून घरात आलेले शुद्ध पेयजल आपण सकाळी दात घासताना, हात धुताना आणि अनेकदा दाढी करताना वाया घालत असतो. नळाची तोटी पूर्णवेळ खुली ठेवून ते शुद्ध पाणी आपण सांडपाण्यात मिसळतोय याची जाणीव ठेवून पाण्याचा माफक वापर करावा.

घरात पाण्याने अंघोळ करताना शॉवर ऐवजी बादलीचा वापर करणे, घरातील गळके नळ आणि तोटी यांची वेळीच दुरूस्ती करून देखील आपण पाण्याचा वापर मर्यादीत ठेवू शकतो. अनेक जण दुचाकी आणि चार चाकी वाहनाला अक्षरश: अंघोळ घालत वाहन साफ करतात. जे पाणी शुद्ध पेयजल आहे त्याला सांडपाण्यात टाकणे प्रत्येकाने थांबवले पाहिजे.

पाण्याच्या बाबतीत असलेली आणखी एक चुकीची संकल्पना म्हणजे शिळं पाणी… घरात एकदा पाणी आपण भांड्यांमध्ये भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी नळाला पाणी आलं आहे अशा स्थितीत हे पाणी शिळं झालं म्हणत भांड्यामधील पाणी फेकून देत आपण नव्याने भांडी भरून घेणं हा उपक्रम वर्षानुवर्षे करत आलो आहोत.

पाणी कधीही शिळं होत नाही. पाण्याचा केमिकल फॉर्म्यूला H2O इतका साधा आहे ते कधी खराब होत नाही किंवा त्याची चव देखील बदलत नाही.

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, पाण्याचा सूर्यप्रकाशाशी संपर्क होत नाही तोवर त्यात कोणताही बदल होत नाही. बाटलीबंद पाणी आपण वापरतो त्यावर Expiry Date असते ते पाणी ज्या प्लास्टिकच्या बाटलीत बंद आहे त्या प्लास्टिकची असते. प्लास्टिकमुळे अशी तारीख टाकण्यात येते. मात्र वर्षानुवर्षे अव्याहत निसर्गत: येणारं पाणी शुद्ध स्थितीत कधीही शिळं होत नाही.

आपण पाणी जाणून घेऊ आणि त्याचा योग्य वापर करून पर्यावरण जपूया… चला विचार बदलूया जबाबदार होऊया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed