• Fri. Aug 14th, 2026

जिल्हा मध्यवर्ती बँकेस मदतीसाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव सादर करणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 14, 2026

बीड, दि. १४ (जिमाका) :- बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत करण्यासाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव आणला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. याबाबत अवसायक, प्रशासक आणि एम.सी.सी. बँकेने त्वरीत कार्यवाही करावी असे निर्देश त्यांना आज बँकेच्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन  रहेमान, पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने आपला व्याजदर कमी करून बीड जिल्हा बँकेला 5 ते 7 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच थेट भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील चालू हंगामातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आणि शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.  राज्य बँकेकडे अडकलेले बँकेचे विविध प्रस्ताव आणि शासनाकडून मिळणारा प्रलंबित व्याज परतावा लवकरात लवकर वर्ग करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच बँकेच्या कृषी आणि अकृषीक कर्जदारांची सद्यस्थिती जाणून घेत बँकेची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल यावर सकारात्मक चर्चा झाली. याबैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed