• Tue. Jul 14th, 2026

    Tukaram Mundhe Strict Action : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित; तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई

    Tukaram Mundhe Strict Action : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित; तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई

    अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई राज्यभरात सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत FDA ने तीन नामांकीत हॉटेल्सचे अन्न परवाना रद्द केले आहेत. यामुळे नियम न पाळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

    तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध प्रशासनाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी हे खातं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण खात असलेलं अन्न कितपत सुरक्षित आहे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच आजारपणात ज्या औषधांचं सेवन करतो ते देखील सुरक्षित असणं अपेक्षित आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडाकेबाज मोहीम सुरु आहे.

    सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला धोका पोहोचेल असं खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर तुकाराम मुंढे यांच्या खात्याकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळे हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, कन्टिन, फूड स्टॉल या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक तपासणी केली जात आहे. अस्वच्छता आणि नियमांचं पालन न केल्या जाणाऱ्या आस्थापनांवर जागेवरच कडक कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई मुंबईत करण्यात आली आहे. मुंबईत तब्बल 3 नामांकीत हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे नियम न पाळणाऱ्या आणि हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

    भेंडीबाजारमधील मे. शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चा परवाना रद्द

    मुंबईच्या भेंडीबाजार येथे प्रसिद्ध असलेल्या मे. शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या आस्थापनावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने 16 एप्रिल 2026 रोजी या हॉटेलमध्ये तपासणी केली होती. या तपासणीनंतर या हॉटेलला 28 एप्रिल रोजी सुधारणा नोटील देण्यात आली होती.

    यानंतर एफडीएने 13 जुलैला मे. शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. येथे छापा टाकला. यावेळी पुनर्तपासणीत 25 गंभीर त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. स्वयंपाकघरातील ओले व घसरडे मजले, कच्च्या मालाची नोंद नसणे, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा अभाव, खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी नसणे, शाकाहारी व मांसाहारी अन्नाची योग्य विलगीकरण व्यवस्था नसणे तसेच कीटकप्रतिबंधक जाळीविना उघड्या खिडक्या अशा गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने 14 जुलैला या हॉटेलचा परवाना रद्द केला आहे.

    Tukaram Mundhe Action

    नूर मोहम्मदी हॉटेलचा परवाना रद्द

    भेंडीबाजार येथील प्रसिद्ध नूर मोहम्मदी हॉटेलचा देखील परवाना रद्द करण्यात आला आहे. एफडीएने सोमवारी इथे छापा टाकला होता. यावेळी स्वयंपाकघरातील मजल्यांवर काळ्या तेलाचे जाड थर, कबाब विभागाजवळ उघड्या खिडक्यांमुळे माश्या, कीटक व कावळ्यांचा मुवत प्रवेश, भिंती व छतांवर निघालेला रंग व तेलाचे थर, कच्च्या मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, जुनी व अस्वच्छ भांडी वापरणे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे तसेच कीटक नियंत्रणासाठी आवश्यक ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे आढळून आले. यामुळे या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

    मे. रहमानिया रेस्टॉरंटचा परवाना निलंबित

    मुंबईच्या उमरखाडी येथील प्रसिद्ध मे. रहमानिया रेस्टॉरंटचा देखील परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएने 13 जुलैला या ठिकाणी छापा टाकत तपासणी केली आणि त्याचवेळी या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला. अन्नपदार्थ, रसायने व पॅकेजिंग साहित्याच्या साठवणुकीसाठी अपुरी व्यवस्था, कीटकप्रतिबंधक नसलेले दरवाजे, गंजणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनविलेली उपकरणे, भिंती व छतांवरील निघालेला रंग व प्लास्टर, अन्नपदार्थांच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदींचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या न केल्याचे आढळून आले.

    ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खाद्य व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल, असं अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा