• Fri. Jul 3rd, 2026

    ‘महाकनेक्ट’ संवादसेतू उपक्रमाव्दारे जागतिक मराठी मने जोडणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 3, 2026
    ‘महाकनेक्ट’ संवादसेतू उपक्रमाव्दारे जागतिक मराठी मने जोडणार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    • जगभरातील मराठी माणूस हा महाराष्ट्राचा राजदूत

    मुंबई, दि ३: जगभरात असलेल्या मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महाकनेक्ट या संवादसेतू उपक्रमाव्दारे जागतिक स्तरावरील ही मराठी मने जोडण्यासाठी, सहसंबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असल्याची माहिती राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

    सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जागतिक मराठी समुदायाशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार सचिव डॉ राजेश गवांदे, राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी तसेच अमेरिकेतील विविध मराठी मंडळाचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणाली वरून उपस्थित होते.

    जगभरातील मराठी माणूस हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजदूत

    राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भारत आज जगातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत असून महाराष्ट्राचा यामध्ये मोठा वाटा आहे. विविध क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे येत आहे. मराठी माणसाने आणि मराठी समुदायाने आपली मराठी संस्कृती व परंपरा आपल्या कर्तृत्वाने आणि परिश्रमाने सातासमुद्रापार पोहोचवली आहे. राजशिष्टाचार विभागाच्या माध्यमातून परकीय थेट गुंतवणूक व प्रवासी भारतीय व्यवहार व संपर्क हे नवे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. याअंतर्गत मराठी माणसाशी आणि समुदायाशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

    मराठी माणूस संशोधन क्षेत्रातही आघाडीवर आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करत आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात, उद्योग उभारणीत अग्रेसर आहे. जगभरातील मराठी माणूस हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजदूत आहे. तो महाराष्ट्राचा भविष्यातील भागीदार आहे. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती,कला, परंपरा व सण-उत्सव जतन करण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी सांगितले.

    महाकनेक्ट हा संवाद सेतू उपक्रम जगभरातील मराठी समुदायाला एका डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणणारा

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरातील भारतीय समुदायाशी आत्मीय नाते निर्माण केले आहे. याव्दारे त्यांनी भारतीय असण्याचा अभिमान अधिक दृढ केला आहे. याच विचारांतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महा-एनआरआय कनेक्ट- महाकनेक्ट या संवाद सेतू उपक्रमातून जगभरातील मराठी समुदायाला एका डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणण्यात येणार आहे. हा संवादाचा मंच आहे. विश्वासाचा सेतू आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून गुंतवणूक, उद्योग, व्यापार, पर्यटन, स्टार्टअप्स, धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग, ज्ञानाची देवाणघेवाण, महाराष्ट्र मंडळांचे जागतिक नेटवर्क, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांचा सहभाग आणि शासनाशी थेट संवाद अशा अनेक सुविधा उपलब्ध होतील असे राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी सांगितले.

     जागतिक मराठी समुदायाकडून विविध क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव संदर्भात सूचना अपेक्षित

    जागतिक स्तरावरील मराठी माणसांकडून आणि मराठी समुदायाकडून विविध क्षेत्रातील ज्ञान, अनुभव आणि सहसंबंध अधिक दृढ करण्यासाठी सूचना अपेक्षित आहेत. महाकनेक्ट या संवाद सेतू उपक्रमाव्दारे विविध क्षेत्रातील विषय हाताळण्यात येणार असल्याचे राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी सांगितले.

    संवाद कार्यक्रमात अमेरिकेतील विविध मराठी मंडळांचा सहभाग

    या संवाद कार्यक्रमात अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रसाद पानवलकर यांच्यासह विजय चौथाईवाले, आनंद गानू तसेच गर्जे मराठी ग्लोबल, मराठी विश्व, महाराष्ट्र मंडळ, शिकागो, ऑॅस्टीन मराठी मंडळ, नॉर्थ अमेरिका फिल्म असोसिएशन, कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ, फिलाडेल्फिया महाराष्ट्र मंडळ, लास व्हेगास मराठी मंडळ, न्यू इंग्लंड मराठी, कॅर्लाईट मराठी मंडळ, पिटसबर्ग मराठी मंडळ, लास व्हेगास मराठी मंडळ, यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

    0000

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *