सर्वदूर व्हायरल झालेला जांभळांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल. स्ट्रेस फ्रूटिंग, मास्टिंग, सुइसाइड फ्रुटिंग यांसारख्या वैज्ञानिक संज्ञांचा उल्लेख असल्यामुळे अनेकांना तो विश्वासार्हही वाटला असेल. मात्र या संदेशात काही वैज्ञानिक तथ्ये आणि काही अतिरंजित निष्कर्ष यांची सरमिसळ झाली आहे.
सर्वप्रथम जांभूळ (Syzygium cumini) हे सुइसाइड फ्रुटिंग करणारे झाड नाही. काही एकप्रसवा (monocarpic) वनस्पतींचे जीवनचक्रच असे असते की त्या आयुष्यात एकदाच फुलतात, फळतात; बिया देतात आणि त्यानंतर त्यांचे जीवन संपते. उदाहरणार्थ बांबूच्या काही प्रजाती, कारवीसारख्या काही वनस्पती. जांभूळ ही त्या प्रकारातील वनस्पती नाही. जांभळाची झाडे अनेक दशके, अगदी शेकडो वर्षे जगू शकतात आणि वारंवार फळधारणा करतात.
व्हायरल संदेशातील मास्टिंग ही संकल्पना खरी आहे. अनेक वृक्षप्रजातींमध्ये काही वर्षी भरपूर फळधारणा होते, तर काही वर्षी कमी. हा निसर्गाचा एक प्रकारचा लयबद्ध उतार-चढाव, निसर्गाचा रीदम आहे. त्याची कारणे अनेक असू शकतात. परंतु याचा अर्थ झाडांना आपला अंत जवळ आला आहे किंवा भविष्यात दुष्काळ येणार आहे हे आधीच समजले आहे, असा होत नाही.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. झाडे किंवा इतर कोणतेही सजीव भविष्यकाळ अचूक ओळखू शकत नाहीत. तसे शक्य असते तर अनेक प्रजाती नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकल्या असत्या. झाडे चालू परिस्थितीला प्रतिसाद देतात. पाण्याचा ताण, तापमान, दिवसाची लांबी, मातीतील पोषणद्रव्ये, उपलब्ध ऊर्जा अशा घटकांवर त्यांची वाढ, फुलोरा आणि फलधारणा अवलंबून असते. पण ती भविष्यात दुष्काळ येणार आहे हे आधीच जाणून निर्णय घेतात, असे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.
मग यंदा जांभूळ इतकी का दिसत आहेत? खरे तर यामागे काही अगदी साधी पर्यावरणीय कारणे असू शकतात. मागील वर्षी पाऊस चांगला झाला असेल आणि मातीमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकून राहिला असेल, तर झाडांची वाढ उत्तम होते. प्रकाशसंश्लेषण अधिक कार्यक्षम होते. झाडामध्ये ऊर्जा आणि अन्नसाठा वाढतो. पाने, फांद्या, मुळे आणि प्रजननासाठी आवश्यक जैविक प्रक्रिया व्यवस्थित पार पडतात. परिणामी पुढील हंगामात फुलोरा आणि फलधारणा अधिक चांगली होऊ शकते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मोहर येण्याच्या काळातील हवामान. जांभळाला फुलोरा येत असताना हवामान कोरडे राहिले, तापमान योग्य राहिले आणि अवकाळी पाऊस झाला नाही, तर फुलोरा टिकून राहतो. उलट वळीव किंवा अवेळी पाऊस आल्यास फुले गळतात. यंदा उन्हाळा कडक होता. माणसे हैराण झाली असतील, पण जांभळाच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल ठरली असण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे मधमाश्या आणि इतर परागीकरण करणारे कीटक अधिक सक्रिय राहिले असतील. परिणामी परागीकरण आणि फलधारणा दोन्ही वाढले असतील.
या वर्षी फार वळीव झाले नाहीत आणि पाऊसही लांबला. पाऊस वेळेत सुरू झाला की जांभळे ओली होतात, खराब होतात आणि त्यांना योग्य भाव मिळत नाही. पण पाऊस लांबला की जांभळे अधिक काळ टिकतात, विक्रीसाठी उपलब्ध राहतात. ‘यंदा जांभळे खूप दिसत आहेत’ याचे हे एक साधे स्पष्टीकरण असू शकते.
याशिवाय गेल्या दहा-पंधरा वर्षांत जांभूळाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यांपैकी अनेक झाडे आता फलधारणेच्या वयात आली असतील. त्यामुळे बाजारात जांभळे अधिक दिसणे हे स्थानिक वृक्षलागवडीच्या यशाचेही लक्षण असू शकते आणि हा कल पुढील काही वर्षेही दिसू शकतो.
या संपूर्ण चर्चेत आणखी एक मानसशास्त्रीय संकल्पना महत्त्वाची आहे. तिला Availability Bias असे म्हणतात. एखादी गोष्ट अचानक आपल्या लक्षात आली की ती पूर्वी नव्हतीच असे आपल्याला वाटू लागते. एखाद्या व्यक्तीला यंदा जांभळे जास्त आहेत असे वाटले, त्यावर एक कथा तयार झाली, समाजमाध्यमांनी ती पुढे नेली आणि आता ती वस्तुस्थिती वाटू लागली आहे.
अर्थात, जुन्या पिढीची निरीक्षणे आणि लोकज्ञान यांना पूर्णपणे नाकारता येणार नाही. अनेक पारंपरिक निरीक्षणांमधूनच विज्ञानाची सुरुवात झालेली आहे. कदाचित काही भागांत जांभूळाची चांगली फलधारणा आणि कोरडा उन्हाळा यांचा संबंध लोकांच्या लक्षात आला असेल. पण एखादे निरीक्षण आणि त्यावरून काढलेला सार्वत्रिक नियम यात फरक असतो. ‘यंदा जांभळे भरपूर आली म्हणजे दुष्काळ येणार,’ असे म्हणण्यासाठी दीर्घकालीन आकडेवारी आणि वैज्ञानिक पुरावे आवश्यक आहेत.
निसर्गाबद्दल इतर मिथके
जांभूळाचा हा व्हायरल संदेश काही पहिलाच नाही. निसर्गाभोवती अशा अनेक आख्यायिका, समजुती आणि अफवा वर्षानुवर्षे फिरत आलेल्या आहेत.
मंकी ऑर्किड (Dracula simia) हे दक्षिण अमेरिकेतील एक खरे ऑर्किड आहे. त्याच्या फुलामध्ये माकडाच्या चेहऱ्यासारखा भास होतो. पण समाजमाध्यमांवर त्याचे अनेक फोटो रंगवलेले, संपादित केलेले किंवा चुकीच्या संदर्भात शेअर केले जातात. त्यामुळे ते हिमालय, सह्याद्री किंवा भारतातील दुर्मिळ वनस्पती असल्याचा गैरसमज पसरतो.
शिवलिंग / नागलिंगम / कैलासपती हा वृक्ष शंकराचे झाड म्हणून प्रसिद्ध, परंतु हा Couroupita guianensis मूळचा दक्षिण अमेरिकेतील वृक्ष आहे. तिथे त्याच्या तोफगोळ्यासारख्या फळांमुळे त्याला ‘कॅनन बॉल ट्री’असे नाव पडले. भारतात आल्यानंतर मात्र, फुलातील काही भाग शिवलिंगासारखे दिसतात म्हणून त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. यात काही गैर नाही. मात्र हे झाड मूळचे भारतीय नसून दक्षिण अमेरिकन आहे, ही गोष्ट अनेकांना माहिती नसते.
काही वर्षांपूर्वी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फिरला होता. एका झाडाला पांढरे गोलसर फळ लागल्याचे दाखवले होते. त्यापैकी एक फळ तोडून काडीपेटी लावताच ते मशालीसारखे पेट घेत होते. अनेकांना ते एखाद्या दुर्मिळ ज्वलनशील फळाचे उदाहरण वाटले. प्रत्यक्षात तेंदू किंवा टेंभुरणीच्या झाडाला बाहेरून ज्वलनशील पदार्थाचे गोळे चिकटवले गेले होते. हा निसर्गाचा चमत्कार नसून मानवनिर्मित प्रयोग होता.
बहावा (Cassia fistula) फुलला की अमुक दिवसांत पाऊस पडतो, ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यावरणीय भविष्यवाण्यांपैकी एक असावी! पण बहाव्याला हवामान खात्यापेक्षा अधिक माहिती असते असे मानण्याचे कारण नाही. तो फुलतो कारण त्याचा तो ऋतू असतो! त्याच्या फुलण्यामागील पर्यावरणीय कारणेही साधारण वर उल्लेखलेल्या जांभळासारखीच असतात.
उंबराला (Ficus racemosa) फूल येत नाही किंवा शंभर वर्षात एकदा येते हा भारतातील सर्वात लोकप्रिय वनस्पती गैरसमज असावा! प्रत्यक्षात उंबराला दरवर्षी फुले येतात, पण ती फळासारख्या दिसणाऱ्या संरचनेच्या आत असतात. त्यामुळे एखादे मशरूम, सायकसचा फुलोरा, शिवलिंग फूल किंवा इतर अनोख्या वनस्पती वेळोवेळी उंबराचे फूल म्हणून व्हायरल होत असतात.
लोकज्ञान, लोककथा आणि विज्ञान हे एकमेकांचे शत्रू नाहीत. लोककथा प्रश्न विचारायला शिकवतात, पण उत्तर शोधण्यासाठी दीर्घकालीन डेटा आणि वैज्ञानिक पुरावे आवश्यक असतात. त्याशिवाय काहीही निष्कर्ष काढू नये. निसर्गाकडे कुतूहलाने पाहा, निरीक्षण करा, प्रश्न विचारा; पण कोणतीही गोष्ट व्हायरल झाली म्हणून ती सत्य मानू नका.
तोपर्यंत मात्र एक काम नक्की करा, जांभळांचा आस्वाद घ्या !
(लेखिका वनस्पती अभ्यासक आहेत.)