• Fri. Jun 26th, 2026

    Raigad Fort : किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली, महादरवाजा-मदार मोर्चा मार्ग बंद, शिवभक्तांमध्ये चिंता

    Raigad Fort : किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली, महादरवाजा-मदार मोर्चा मार्ग बंद, शिवभक्तांमध्ये चिंता

    किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे महादरवाजा ते मदार मोर्चा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अवघे दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना मोठी घटना घडली आहे. रायगडाच्या पायरी मार्गावरील महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान मोठे दगड कोसळल्याने हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे पायरी मार्गावर दरड आणि मोठे दगड आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

    दरड हटवण्याचे काम सुरु

    घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दगड हटविण्याचे काम हाती घेतले आहे. यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काम पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी सध्या या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    प्रशासनापुढे मोठं आव्हान

    विशेष म्हणजे, येत्या 27 जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता आहे. अशा महत्त्वाच्या सोहळ्याला अवघे दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी उरलेला असताना पायरी मार्ग बंद झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    शेवप्रेमींची महत्त्वाची मागणी

    स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील स्थळी पावसाळ्याच्या काळात नियमित पाहणी, दरडप्रवण भागांवर उपाययोजना आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

    प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न

    दरम्यान, मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी मार्ग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. आता या मार्गावरील अडथळे किती लवकर दूर होतात आणि शिवभक्तांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा