• Mon. Jun 15th, 2026

    अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम; ३३ आरोपी अटकेत, २७ आस्थापना सील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 29, 2026
    अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक मोहीम; ३३ आरोपी अटकेत, २७ आस्थापना सील – महासंवाद

    मुंबई, दि. २९: राज्यातील ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री प्रकरणांमध्ये २५ एफआयआर दाखल झाले असून ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईस्क्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांचा सुमारे ₹२८.७८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.

    राज्यभर भेसळ, प्रतिबंधित गुटखा विक्री, असुरक्षित अन्न उत्पादन आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष धाडी व जप्ती मोहीम राबविण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले होते. २५ ते २७ मे २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात व्यापक कारवाई करण्यात आली.

    आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण राहील”.

    आयुक्त मुंढे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केवळ दंडात्मक नव्हे तर फौजदारी कारवाईही करण्यात येईल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १२९ अंतर्गत ‘चॅप्टर केसेस’ दाखल करून संबंधितांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येणार आहे. पुन्हा गुन्हा आढळल्यास थेट एफआयआर दाखल करण्यात येईल.

    या अनुषंगाने धडक मोहिमेत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले.

    गुटखा व प्रतिबंधित पदार्थांवर मोठी कारवाई

    राज्यातील ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणांमध्ये:

    – २५ एफआयआर दाखल

    – ३३ आरोपींना अटक

    – ५ वाहने जप्त

    – २७ आस्थापना सील

    – सुमारे २०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून १९ आस्थापना सील करण्यात आल्या. तसेच १९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

    इतर अन्नपदार्थांवरही व्यापक तपासणी

    गुटख्याव्यतिरिक्त राज्यातील विविध विभागांत २३ आस्थापनांची तपासणी करून पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईस्क्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांचा सुमारे २८.७८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

    राज्यभरातील प्रमुख कारवाया

    जळगाव : कृत्रिम दूध निर्मिती उघड

    धरणगाव तालुक्यात गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    पुणे : रसायनांनी पिकवलेले आंबे जप्त

    इंदापूर येथील एका आस्थापनात इथिलीन रसायनांचा वापर करून आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचे निदर्शनास आले. सुमारे २० हजार किमतीचे आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले.

    धुळे : अस्वच्छ वातावरणात बेसन उत्पादन

    धुळे जिल्ह्यातील एका आटा मिलमध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत मटर बेसन तयार केले जात असल्याचे आढळले. सुमारे १४ लाखांचा साठा जप्त करण्यात आला.

    मुंबई : नियमबाह्य नूडल्स उत्पादनावर कारवाई

    धारावीतील एका उत्पादन केंद्रात लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला.

    नाशिक : बनावट लेबलिंग व निकृष्ट तेल विक्री

    परवाना नसताना खाद्यपदार्थ उत्पादन, बनावट लेबलिंग आणि निकृष्ट दर्जाचे तेल विक्री करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

    पालघर : अस्वच्छ आईस्क्रीम उत्पादन

    पालघर जिल्ह्यातील एका आस्थापनात अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन होत असल्याचे आढळून आले. लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

    अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

    तक्रार करताना

    – स्वतःचे नाव व संपर्क क्रमांक,

    – संबंधित आस्थापनाचा अचूक पत्ता,

    – कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात यावी.

    याशिवाय, नागरिकांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येणार असून लवकरच टोल-फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

    ००००

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed