• Sat. Jun 6th, 2026
    MHADA lottery 2026: म्हाडाच्या घरांसाठी अक्षरशः झुंबड! मुंबईतल्या 2640 घरांसाठी 82 हजारांहून अधिक अर्ज, शेवटचे 3 दिवस बाकी

    MHADA lottery 2026: म्हाडाच्या मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अर्जाची अंतिम मुदत २८ मे असून विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, ताडदेवसह अनेक भागांत घरे उपलब्ध आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) २,६४० घरांच्या सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज प्रक्रियेसाठी अजून तिन दिवसांची मुदत शिल्लक असल्याने अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या या सोडतीकडे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे लक्ष लागले आहे. विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वडाळा, घाटकोपर, पवई, दादर, वांद्रे आणि गोराईसारख्या भागांमध्ये घरे उपलब्ध असल्याने अर्जदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

    २८ मेपर्यंत अर्जाची मुदत

    म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छुकांना २८ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यापूर्वी अर्जाची अंतिम मुदत १४ मे होती. मात्र अर्जदारांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मुदत वाढवण्यात आली. आता ही मुदत पुन्हा वाढवली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

    अर्जासाठी कोणती कागदपत्रं?

    अर्ज करताना आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आयकर विवरणपत्र आवश्यक आहे. विवाहित अर्जदारांसाठी पती किंवा पत्नीचे आधार व पॅन कार्ड बंधनकारक आहे. तसेच जात प्रमाणपत्र, विशेष प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे आणि विधवा अर्जदारांसाठी मृत्यू प्रमाणपत्रही जोडावे लागणार आहे.

    Maharashtra TimesAmbenali Ghat Accident: ‘त्यांची जागा मी भरून काढू शकत नाही’; आंबेनळी घाटातील मृतांच्या कुटुंबीयांना धीर देताना उदयनराजे गहिवरले

    ईएमडीसाठी शेवटची तारीख

    ऑनलाइन अर्ज २८ मेपर्यंत करता येणार असले तरी अनामत रक्कम म्हणजेच ईएमडी भरण्यासाठी २९ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जदारांना संबंधित बँकेच्या कामकाजाच्या वेळेत RTGS किंवा NEFT द्वारे ही रक्कम जमा करावी लागणार आहे.

    अंतिम यादी कधी?

    म्हाडाच्या वेळापत्रकानुसार १० जून रोजी दुपारी ३ वाजता पात्र अर्जदारांची प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १२ जूनपर्यंत हरकती आणि दावे नोंदवण्याची संधी दिली जाईल. अंतिम पात्र यादी १६ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर संगणकीकृत सोडतीची तारीख आणि वेळ जाहीर केली जाणार आहे.

    काही घरांच्या किंमतीत कपात

    म्हाडाने काही घरांच्या किंमतीतही कपात केली आहे. विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमतीत सुमारे ७.५ टक्के घट करण्यात आली आहे. यामधील ६१० घरांची श्रेणी मध्यम उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात बदलण्यात आली आहे. त्यामुळे काही अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    ६६ टक्के घरे अजून बांधकामाधीन

    या सोडतीतील २,६४० घरांपैकी तब्बल १,७६२ घरे अजून बांधकामाधीन आहेत. ही घरे प्रामुख्याने विक्रोळी, गोरेगाव आणि बोरीवली परिसरात आहेत. बोरीवली पूर्वेत १२८, गोरेगाव पश्चिमेत ८५ तर उर्वरित घरे विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात आहेत.

    घरांच्या किंमती किती?

    या सोडतीतील सर्वात महाग घर दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे असून त्याची किंमत सुमारे ६.८२ कोटी रुपये आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मानखुर्दमध्ये उपलब्ध घरांची सुरुवातीची किंमत सुमारे २९ लाख रुपये आहे. गोरेगावमधील ३०० चौरस फुटांच्या घराची किंमत सुमारे ३२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या मर्यादित पर्यायांमध्ये म्हाडाची ही सोडत सर्वसामान्यांसाठी मोठी संधी मानली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा