• Mon. Jun 15th, 2026

    यूपीएससी वन सेवा परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2026
    यूपीएससी वन सेवा परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मार्गदर्शन घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ४ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात कबीर राहुल कांबळे यांनी १२५ वा तर अक्षय विजय बर्हे यांनी १४० वा क्रमांक मिळवत यश प्राप्त केले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय बार्टी संस्थेकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याला दिले आहे.

    बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना यूपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत चाचणीच्या तयारीसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिले जाते. भारतीय वन सेवा २०२५ मुख्य परीक्षेसाठी ५२ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले होते, तर त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी मुलाखत आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतला होता.

    या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या विविध टप्प्यांवर बार्टी संस्थेकडून तज्ज्ञ मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यास मोठी मदत झाली.

    बार्टीच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करून प्रशासकीय सेवेत प्रवेश करणाऱ्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे ‘बार्टी’च्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed