• Sun. Jun 14th, 2026

    उड्डाणपुलाची रखडपट्टी; ऐरोली-काटई नाका मार्गाचे भूसंपादन अपूर्ण, डोंबिवली-नवी मुंबई वाहतूककोंडी कायम राहणार?

    उड्डाणपुलाची रखडपट्टी; ऐरोली-काटई नाका मार्गाचे भूसंपादन अपूर्ण, डोंबिवली-नवी मुंबई वाहतूककोंडी कायम राहणार?

    Thane-Navi Mumbai Travel: ऐरोली येथील एनएच-4 ते डोंबिवलीतील काटई नाका यांना जोडणाऱ्या प्रस्तावित एलिव्हेटेड रोडची 2028ची डेडलाइन चुकण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने या पुलाचे कंत्राट ऑक्टोबर 2024मध्ये दिले होते तरी दीड वर्षांनंतर अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नाही.

    श्रीकांत सावंत, ठाणे : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने ऐरोली ते काटई नाका (एनएच ४) उड्डाणपुलाच्या कामाच्या तिसऱ्या टप्प्याचे कंत्राट ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्यानंतर दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी ती पूर्ण होण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी ऐरोली-काटई उड्डाणपूल प्रकल्पाची रखडपट्टी झाली आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाची २०२८ पर्यंतची डेडलाइन एका वर्षाने लांबण्याची शक्यता आहे.

    प्रवास अवघ्या 10 मिनिटांत

    नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली परिसरातून वाहनचालकांना कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शीळफाटा-महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून बदलापूच्या दिशेने प्रवास करताना होणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली-काटई नाका उन्नत आणि भूमीगत अशा दोन्ही पद्धतीने सहापदरी रस्त्याची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. शिळफाट्यावरील वाहतूककोंडी दूर करून ऐरोली ते काटईपर्यंतचा प्रवास अवघ्या १० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.Maharashtra TimesNavi Mumbai News: ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार

    तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकर पोहोचण्यासाठीही या मार्गाचे महत्त्व वाढणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्याची कामे सुरू असतानाच ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर १२ महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पाचे काम सुरू होण्याची आवश्यकता होती. परंतु या प्रकल्पाचे कंत्राट देऊन १७ महिन्यांनंतरही अपेक्षित भूसंपादन प्रकिया पूर्ण झाली नसल्याने या प्रकल्पाच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्याची कबुली एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

    ठाणे महापालिकेच्यावतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात असून साधारण सप्टेंबर २०२६पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ती पूर्ण झाल्यानंतर कामे सुरू होऊन उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास नियोजित डेडलाइनपेक्षा एक वर्षापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

    प्रत्यक्ष कामाला चार महिने

    जमीन संपादन पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी किमान चार महिने लागतील. या कालावधीत भू-तांत्रिक तपासणी, माती परीक्षण, आराखडे तयार करणे आणि आवश्यक असल्यास युटिलिटी स्थलांतराची कामे केली जातील. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकते. पावसाळा जवळ येत असल्याने जमीन संपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    भूसंपादन प्रक्रिया सुरू

    या प्रकल्पासाठी कौसा, डोनकर, डवळे, शीळ, देसाई आणि कटाई या सहा गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एका गावासाठी मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, उर्वरित पाच गावांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार

    असा आहे उन्नत मार्ग…

    ६.७ किमी लांबीच्या या उड्डाणपुलामध्ये ६ किमीचा व्हायाडक्ट, भारतीय रेल्वे, आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन (डीएफसीसीआयएल) मार्गावर १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी), १.५८ किमी रॅम्प आणि ६.३२ किमी सेवा रस्ते यांचा समावेश आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा