जगभरात आज जागतिक मातृदिनी आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. आई म्हणजे आपल्या मनाची हळवी बाजू. महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळीदेखील आज आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भावूक होताना दिसत आहेत. त्यांच्याकडून जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आई म्हणजे प्रत्येकाच्या मनातील अत्यंत हळवी बाजू. संपूर्ण जग फिरल्यानंतरही आपण जिच्या चरणाशी लोटांगण घालतो ती म्हणजे आई. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, असं म्हणतात. आईचे प्रेम, माया यांची कधीच कुठल्या गोष्टीसोबत तुलना होऊ शकत नाही. आई आपल्यावर संस्कार करते, आपल्याला घडवते, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आईचं मार्गदर्शन मौल्यवान ठरतं. आईशिवाय या जगात सर्व काही शुन्य आहे, असं म्हणतात. आई आहे म्हणूनच आपण आहोत. जगभरात आज मातृदिवस साजरा केला जातोय. आईचं आपल्या मुलांप्रतीच्या समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा विशेष दिवस आहे. आज प्रत्येक जण आपल्या आईविषयी बोलतोय. सोशल मीडियावर व्यक्त होतोय. यामध्ये राज्याचे दिग्गज नेतेमंडळी देखील आहे. या राज्याचे पालक बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अनेक दिग्गज नेत्यांनी आज आईच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या आहेत. अनेक नेत्यांनी मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जयंत पाटील यांची खास पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते जयंत पाटील यांनी एक्सवर खूप सुंदर पोस्ट करत आई विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आई… आपण मोठे होत जातो, तसं आयुष्य आपल्याला अनेक नाती दाखवतं. पण प्रत्येक नात्यामागे निस्वार्थ प्रेम म्हणजे काय, हे शिकवणारी एकच व्यक्ती असते; ती म्हणजे आई. ती आपल्या मुलांसाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवते, रात्रभर जागूनही सकाळी हसत उभी राहते, आपण हरलो तर धीर देते आणि जिंकलो तर शांतपणे डोळ्यांत आनंद साठवते… जगातील प्रत्येक आईला जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा”, अशा शुभेच्छा जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांच्याकडून भावनिक व्हिडीओ शेअर
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजित पवार यांचा आईसोबतचा फोटो आहे. यासोबत अजित पवार, अजित पवार यांच्या आई, सुनेत्रा पवार आणि त्यांचे दोन्ही पुत्र यांचा एकत्रित फोटो देखील या व्हिडीओत आहे. या व्हिडीओत आई विषयी कविता आहे. यामध्ये एक ओळ खूप सुंदर आहे. “आई उच्चाराने होईल सगळ्या वेदनांचा अंत”, असं या व्हिडीओत म्हटलं आहे.
राजेश टोपे यांची विशेष पोस्ट
कोरोना काळात राज्याला धीर देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील आईबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी ! आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, मायेची ऊब आणि आयुष्यभर साथ देणारी शक्ती. तिच्या संस्कारांतूनच माणूस घडतो आणि कुटुंबाला आधार मिळतो. प्रत्येक आईच्या त्याग, प्रेम आणि कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”, अशा शुभेच्छा राजेश टोपे यांनी ‘एक्स’वर दिल्या आहेत. यावेळी त्यांनी कवितेच्या काही ओळी देखील शेअर केल्या आहेत. “दिला जन्म तू, विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये, सुखे साहिलेस, जिण्यालागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली, पावलांस”, अशा ओळी राजेश टोपे यांनी मांडल्या आहेत.
चित्रा वाघ यांच्याकडूनही स्पेशल व्हिडीओ ट्विट
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “मम्मी … तुझ्यातली मूठभर जिद्द, कणखरपणा, आणि भरभरून प्रेम, माझ्यात आलं तरी मी आयुष्य जिंकेन… जगातली सगळ्यात श्रीमंत मुलगी आहे मी, कारण माझ्याकडे “तू” आहेस”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी शेअर केला व्हिडीओ
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीदेखील मातृदिनाच्या निमित्ताने विशेष व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ्या आयुष्यातील यशाची प्रत्येक पायरी आईच्या प्रेमातून आणि संस्कारातून साकारली आहे. मला घडवणारी माझी शारदा, माया करणारी माझी वरदा”, अशा भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मातृदिनाच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. जागतिक मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून मातृदिनाच्या शुभेच्छा
श्रीकांत शिंदे यांच्याकडून शुभेच्छा
“आई आयुष्यातील प्रत्येक संकटात धीर देणारी शक्ती, प्रत्येक आनंदामागचं खरं कारण आणि निस्वार्थ प्रेमाचं सर्वात सुंदर रूप. तिच्या मायेची ऊब आणि आशीर्वादामुळेच आयुष्य अधिक सुंदर होतं. जागतिक मातृदिनानिमित्त सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा”, अशा शुभेच्छा खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा