• Tue. Jun 16th, 2026

    संकटात धावला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, कर्करोगाच्या उपचारासाठी भरीव मदत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 5, 2026
    संकटात धावला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, कर्करोगाच्या उपचारासाठी भरीव मदत – महासंवाद

    रायगड, दि. ५ : रायगड जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाले. उपचार खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने कुटुंबीयांपुढे मोठे संकट उभे राहिले. अशावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्यावर आवश्यक उपचार करणे शक्य झाले.

    मयूर चांदुरकर यांना मागील ९ ते १० वर्षांपासून किडनी संबंधित आजाराचा त्रास होता. अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि अशक्तपणा वाढू लागला. प्रकृती खालावत असल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. रक्त चढवूनही हिमोग्लोबिन स्थिर राहत नसल्याने डॉक्टरांनी पुढील तपासण्या केल्या. त्यातून चांदुरकर यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले.

    रायगड जिल्ह्यातील महाड येथील मयूर चांदुरकर हे किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरी वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन अपत्ये अशी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत कर्करोगाच्या उपचारासाठी लागणारा सुमारे १५ ते १८ लाख रुपयांचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी कठीण होते.

    सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या माध्यमातून मदतीसाठी कक्षाकडे अर्ज केला. आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीची व कौटुंबिक जबाबदाऱ्यांची माहिती त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यापर्यंत पोहोचवली.

    या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार चांदुरकर यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या समन्वयातून टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदतही मिळाली. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक उपचार वेळेत सुरू करणे शक्य झाले.

    उपचारानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत आहे. उपचारानंतर त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली असून ते आता सुखरूप घरी परतले आहेत. या कठीण काळात मिळालेल्या मदतीबद्दल चांदुरकर व त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आभार मानले आहेत.

    राज्यातील कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सातत्याने कार्यरत आहे. मयूर चांदुरकर यांच्यासारख्या अनेक गरजू रुग्णांना या माध्यमातून मदत मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून, गरजू रुग्णांनी मदतीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed